*कोकण Express*
*मालवण नगरपालिकेची धडक कारवाई*
*नियोजित वेळेत दुकाने बंद न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई*
*मालवण ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहिम मालवण नगरपालिकेने हाती घेतली आहे. मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी व ठोस उपाययोजना हाती घेण्यासाठी भरारी पथक प्रमुख गीतांजली नाईक, विजय रावले, सुभाष कुमठेकर, बस्त्याव फर्नांडिस, वीणा पारधी, अनिकेत चव्हाण, आनंद वळंजू, बाळकृष्ण जाधव यांच्या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
मालवण शहरातील नियोजित वेळेनंतर सुरू असलेली किराणा दुकाने, पानपट्टी दुकाने, भाजीपाला विक्रेते तसेच चायनीज हॉटेल, नाश्ता हॉटेल, कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये ग्राहक बसण्याचे निदर्शनास आल्याने त्या हॉटेल मालकांवर तसेच रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांवर भरारी पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच पुन्हा-पुन्हा नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांच्यावर साथरोग आटोक्यात येईपर्यंत किंवा कायमस्वरुपी दुकाने सील करण्यात येतील, अशी सक्तीची समज देण्यात आली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नगरपालिकेने स्पष्ट केले.