*कोंकण एक्सप्रेस*
*साक्षी परब “मी गृहीता” तर तन्वी गोसावी “मिस गृहीता २०२६” च्या मानकरी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव देवस्थान कॅम्प भटवाडी व गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मी गृहिता २०२६ च्या वेंगुर्ला परबवाडा येथील साक्षी परब तर मिस गृहिता २०२६ च्या सावंतवाडी निरवडे येथील तन्वी गोसावी मानकरी ठरल्या.
जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले भटवाडी येथे ७ मार्च रोजी सलग ३ ऱ्या वर्षी गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेविका गौरी मराठे यांच्या संकल्पनेतुन विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासहित सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या “मी गृहिता २०२६” खेळ गृहिणींची सन्मान गृहितांचा स्पर्धेत वेंगुर्ले परबवाडा येथील साक्षी परब मी गृहिता २०२६ च्या मानकरी ठरल्या. त्यांचा फ्रीज देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर अनीता मराठे – मयेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना टीव्ही व मानसी परब यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांना शेगडी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले.
मिस गृहिता २०२६ फॅशन शो मध्ये तन्वी गोसावी (सावंतवाडी- निरवडे) या मिस गृहिता २०२६ च्या मानकरी ठरल्या. नंदिनी बिले (सावंतवाडी) उपविजेत्या तर भक्ती जामसंडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बेस्ट स्माईल किताब शितल टिक्कल (कुडाळ) व बेस्ट कॉश्च्युम किताब पायल गावडे (वेंगुर्ला) यांनी पटकावला विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्राईड गोवा विजेती माधवी शहापुरकर, लीना मलबारी व किरण मेस्त्री यांनी केले.
तसेच यावेळी घेण्यात आलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत कविता किशोर राऊत (बिट इडली) यांनी प्रथम, सारिका मदन खोबरेकर (शहाळ्याचा हलवा) यांनी द्वितीय तर जान्हवी विकास कांबळी (इडली सांबार) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर पुरुषांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पाककला स्पर्धेत मनोहर कृष्णा कावले (मासवडी) यांनी प्रथम, सुहास अनंत परब (शिरवाळे) यांनी द्वितीय व प्रीतम रमेश राऊळ (लाव्हारीया) तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्याना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण डॉ. सायली प्रभू, गौतम शिरसाट व अमित सुकी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गौरी मराठे, सचिव डॉ. पूजा कर्पे, सदस्य प्रगती चव्हाण, संचया राऊळ, मंजुषा आरोलकर, रोहिणी लोणे, अनुराधा वेर्णेकर, नीता मुणनकर, शिवाली ताम्हणेकर, राधा बागवे, राधिका लोणे, रसिका परब यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर चराटकर यांनी केले.
फोटोओळी – मी गृहिता २०२६ च्या मानकरी साक्षी परब यांना फ्रीज देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

