मी सिंधुकन्या’ स्वाक्षरी मोहिमेतून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा उत्साहात

मी सिंधुकन्या’ स्वाक्षरी मोहिमेतून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*‘मी सिंधुकन्या’ स्वाक्षरी मोहिमेतून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा उत्साहात*

*_• तज्ञांचे मार्गदर्शन, आरोग्य-कायदे व ताण-तणाव व्यवस्थापनावर सत्रे_*

*_• एक हजारांहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग_*

*सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका)*

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय क्षमता बांधणी शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवसीय मेळावा शुक्रवार (दि १३) आयोजित करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात एक हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सिंधुकन्या’ लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच ‘मी सिंधुकन्या…’ या संकल्पनेतून स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. मुलींच्या सन्मान व सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी पालखी आणि दिंडी काढण्यात आली. याचवेळी जनजागृतीसाठी सजविण्यात आलेल्या चित्ररथाचेही उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विविध विभागाच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी गणेश नमन, बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर पथनाट्य, पोवाडा, फुगडी, सावित्रीच्या लेकी ही नाटिका, नारीशक्ती रुपे, लावणी नृत्य, महिला स्वसंरक्षण तसेच स्त्री भ्रूण हत्या या विषयावर नाटिका, रोंबाट अशा प्रकारचे विविध सादरीकरण महिलांनी यावेळी केले.

या मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, महिला बचत गट, माविम, उमेद, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय तसेच अंगणवाडी सेविका आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्याच्या दुपारच्या सत्रात विविध तज्ञांनी महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. सुभाष दळवी यांनी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अनेकदा व्यक्ती भूतकाळातील घटनांमध्ये अडकून राहते किंवा भविष्याबद्दल अति चिंता करते, त्यामुळे वर्तमानातील संधी गमावल्या जातात, असे ते म्हणाले. सकारात्मक विचारसरणी, कुटुंबातील सौहार्दपूर्ण नाते, संवाद आणि ध्यान-योग-प्राणायाम यांचा अवलंब केल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

महिला आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. प्रियांका कासार-पाटील यांनी महिलांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने तिचे आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे. सकस आहार, नियमित दिनचर्या, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीर सुदृढ राहते व कार्यक्षमता वाढते. अनेक महिला लहान-मोठ्या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करतात; मात्र वेळेत वैद्यकीय उपचार घेतल्यास गंभीर आजार टाळता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. प्रणिता कोटकर यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची सविस्तर माहिती देताना मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सन्मान वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच ‘पॉक्सो कायदा’ (Protection of Children from Sexual Offences Act, 2012) याविषयी माहिती देताना १८ वर्षांखालील मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला असल्याचे सांगितले. या कायद्याअंतर्गत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान संरक्षण मिळते. लैंगिक छळ किंवा अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास कठोर शिक्षा व दंडाची तरतूद असून अशा प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाते. तसेच पीडित मुलांची ओळख गुप्त ठेवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, कायदेविषयक माहिती तसेच मुलींच्या सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन मिळाले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाला बळकटी देत महिलांना जागरूक आणि सक्षम करण्याच्या दिशेने हा मेळावा महत्त्वाचा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!