आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल – महेश गुरव

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल – महेश गुरव

*कोंकण एक्सप्रेस*

*आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल – महेश गुरव*

*दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण*

*कणकवली ः संजना हळदिवे*

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात खालची गुरववाडी येथील 40 ते 45 घरांना पुराचा वेढा बसत होता. त्यामुळे ही समस्या पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर आम्ही मांडली होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गाळमुक्त नदी उपक्रमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. गेल्यावर्षी काही प्रमाणात गाळ काढण्यात आला होता. आता, पुन्हा गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल, असे मत सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील आशिये गडनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आशिये माजी सरपंच सदानंद बाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जलसंपदा विभाग सहाय्यक अभियंत्या ऐश्वर्या जौंदाळ, सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, अनिल गुरव, सुहास खानोलकर, ग्रा.प.सदस्य सुहास गुरव, बाळकृष्ण गुरव, बाळकृष्ण पुजारे, श्रीधर माणगावकर, धोंडू माणगावकर, लवू पुजारे, रत्नागर गुरव, धोंडू गुरव, निलेश पुजारे, मनोहर नाईक, रत्नाकर गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सहाय्यक अभियंत्या ऐश्वर्या जौंदाळ म्हणाल्या , जिल्हा नियोजनमधुन या कामासाठी निधी मंजूर असून जलसंपदा विभागाच्यामार्फत मशीनच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या गाळमुक्त कामामुळे गडनदीचे पात्र अधिक खोल व रुंद होणार असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात आशिये गावात पूरस्थितीचा धोका कमी होऊन परिसरातील शेती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे. तसेच नदीपात्र स्वच्छ झाल्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लागणार आहे.
दरम्यान , पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधुन विशेष निधीची तरतुद करत आशिये गावातील पुरस्थितीची समस्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!