ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मगावी साहित्याचा जागर; जन्म शताब्दी वर्ष सांगता उपळे येथील घरी

ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मगावी साहित्याचा जागर; जन्म शताब्दी वर्ष सांगता उपळे येथील घरी

*कोंकण एक्सप्रेस*

*ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मगावी साहित्याचा जागर; जन्म शताब्दी वर्ष सांगता उपळे येथील घरी*

*तळेरे*

ज्येष्ठ ललित लेखक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कणकवली येथील साहित्य प्रेमींनी राजापूर तालुक्यातील उपळे या त्यांच्या जन्मगावी जाऊन एक आगळावेगळा ‘साहित्य प्रवास’ संपन्न झाला. पिंगे यांच्या लालित्यपूर्ण शब्दांनी त्यांच्याच जन्मभूमीत पुन्हा एकदा साहित्याचा मळा फुलवला.

कणकवली येथील साहित्यप्रेमी प्रसाद घाणेकर, दिनेश कुंभार, तनिष सावंत, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य वैद्य नीलेश कोदे, कोमसाप कणकवली शाखेचे कार्यवाह नीलेश ठाकूर, कोषाध्यक्ष सिद्धेश खटावकर आणि सदस्य प्रवीण कुबल यांनी १२ मार्च (गुरुवारी) ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या उपळे येथील घराला भेट दिली.

​कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेच्या प्रतिनिधींनी मुद्दाम पिंगे यांच्या मूळ गावी, उपळे येथे भेट दिली. यावेळी रवींद्र पिंगे यांच्या निवडक ललित लेख आणि कथांचे भावपूर्ण अभिवाचन करण्यात आले. यावेळी पिंगे यांच्या ललितलेखनात अनेक वेळा उल्लेख असलेल्या उपळे येथील त्यांच्या घरात पिंगे यांची कन्या चित्रा वाघ यांनी २०२५ च्या संवादसेतू दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या ‘माझे बाबा आणि मी’ या लेखाच्या त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रण ऐकवण्यात आले.

पिंगे यांचा महाराष्ट्र शासनाने १९७६ साली पुरस्काराने गौरविलेला पहिला ललितलेखसंग्रह ‘शतपावली’. यातील कुसुमाग्रज यांच्या भेटीसंबंधातील ‘कवीची सुखद भेट’ या लेखाचे अभिवाचन प्रसाद घाणेकर यांनी तर ‘प्रकाशाची खिडकी’ मधील ‘संतोष’ या लेखाचे अभिवाचन नीलेश कोदे यांनी केले. पिंगे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सांबप्रसाद पिंगे व कन्या चित्रा वाघ यांच्या सौजन्याने उपळे येथील घराला भेट देणे शक्य झाले. त्या घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या विजया घाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

केवळ बंदिस्त सभागृहात कार्यक्रम न करता, प्रत्यक्ष लेखकाच्या गावी जाऊन, तिथल्या मातीत त्यांच्या साहित्याचे वाचन करणे हा एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावूक अनुभव असल्याचे सहभागी सदस्यांनी यावेळी नमूद केले. पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला दिलेली ही एक आगळीवेगळी आणि अर्थपूर्ण मानवंदना ठरली असून या उपक्रमाचे साहित्य वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!