*कोंकण एक्सप्रेस*
*युद्ध मिटातोवर बंटी तू भायर जावच नको बाबा!*
*आखाती देशात नोकरी करणाऱ्या विजयच्या आईची आर्त हाक*
*शिरगांव : संतोष साळसकर*
“युद्ध मिटातोवर बंटी तू भायर जावच नको बाबा.” ही आर्त हाक साळशीमधील विजय महाजन यांच्या आई रोहिणी महाजन यांनी आपल्या मुलाला मारली आहे. कतारमधील नोकरीमुळे परदेशात असलेल्या विजयच्या सुरक्षेसाठी एका आईचे काळीज कासावीस झाले असून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दिवसातून अनेक वेळा मायलेकाची ख्यालीखुशाली सुरू असते. कतारमधील डोहा एअरवेजमध्ये अधिकारी पदावर काम करणाऱ्या विजयला आठवड्यातून शुक्रवार-शनिवारी सुट्टी असताना आईने फोनवर विचारले, “आज तू घरात कसो रे? नेहमी शुक्रवारची सुट्टी असते.” त्यावर विजय म्हणाला, “घरूनच वर्क फ्रॉम होम चालू आहे. तू टीव्हीवरील बातम्या पाहिल्या नाहीस का? आखाती देशांमध्ये युद्ध पेटले आहे.” आईने टीव्ही लावताक्षणी आकाशात हवेत फुटणाऱ्या मिसाईलचा आवाज ऐकला आणि “माका बाबा टेन्शन येता,” या भीतीमुळे त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे जावे लागले. बातम्या पाहून जीव वर-खाली झाल्याचे रोहिणी महाजन यांनी सांगितले.
विजयने आईला धीर देत सांगितले की, सध्या विमानसेवा बंद असून खबरदारी म्हणून घरातूनच काम सुरू आहे. खाण्यापिण्यासाठी साहित्याची तरतूद अगोदरच केली असून मुलांच्या शाळाही बंद आहेत. मागील वर्षी रोहिणी महाजन वीस दिवस मुलासोबत परदेशी फिरण्यासाठी कतारमध्ये गेल्या होत्या. मात्र, “थयला वातावरण माका मानावलाच नाय, माझो कोकणच बरो,” असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर उलट आजारी पडल्यामुळे मुलाला उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला होता. गावात राहत असल्या तरी औषधे आणि घरखर्चासाठी दरमहा विजयने पाठवलेली रक्कमच त्यांना जीवनावश्यक आधार देत आहे. “शहरात, परदेशात नोकरी करून चार पैसे गाठीशी राहावेत असे वाटते, पण अशी परिस्थिती आली की मनात भीतीचे काहूर उठते,” असे सांगत अध्यात्माची प्रचंड ओढ असलेल्या रोहिणी महाजन सध्या सतत नामस्मरण आणि प्रार्थना करत आहेत. विजयने दुबईहून आणलेल्या देवाच्या फोटोसमोर नित्यनेमाने पूजा करून, “माझो जीव बंटीक सुखरूप ठेव,” असे साकडे त्या घालत आहेत.
या परिस्थितीवर बोलताना विजय महाजन म्हणाला की, “आई ही आईच असते, युद्धाच्या परिस्थितीची माहिती काही वेळा तिच्यापासून लपवावी लागते. घरातून काम करत असलो तरी खिडकीतून दिसणारे हवेतील आगीचे लोळ आणि स्फोटांच्या आवाजांमुळे छाती धडधडते. नोकरी करत असलो तरी येथे शेजारधर्म नाही. नेहमीचेच एकमेकांचे चेहरे बघायचे आणि जीव मारून राहायचे. आपली काळजी आपणच घ्यायची आणि जीव मुठीत धरून जगायचे, हेच इथले वास्तव आहे.”

