*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती महादेव गवस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे येथील पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्या सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत होती.
महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर या दोघींमधील कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पार्वती गवस यांचे नाव पुढे आले असून त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या निवडीकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.

