*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता…*
*सुस्मिता जाधव सभापती, तर गौरव मुळीक यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या सावंतवाडी पंचायत समितीला अखेर नवे लोकप्रतिनिधी मिळाले असून महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे. सोमवारी येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सभापती पदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव तर उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस व कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांनी प्रशासकीय सहकार्य केले.
तब्बल ४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरली. पंचायत समितीमध्ये भाजपचे ६, शिवसेनेचे ६, अपक्ष ५ आणि उबाठा शिवसेनेचा १ असे बलाबल होते. सभापती पद आरक्षित असल्याने महायुतीच्या रणनीतीनुसार ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुस्मिता जाधव आणि याच मतदारसंघातील भाजपचे सदस्य गौरव मुळीक यांनी सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. दोन्ही पदांसाठी केवळ एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.या निवडीसह सावंतवाडी पंचायत समितीला २४ वे सभापती लाभले असून सुस्मिता जाधव या समितीच्या ९ व्या महिला सभापती ठरल्या आहेत. महायुतीच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, सदाशिव राणे, महेश धुरी, धनश्री मराठे, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, नेहा कांबळी, जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

