अवांतर वाचनानेच व्यक्तिमत्त्व समृद्ध होते : तहसीलदार रमेश पवार

अवांतर वाचनानेच व्यक्तिमत्त्व समृद्ध होते : तहसीलदार रमेश पवार

*कोंकण एक्सप्रेस*

*अवांतर वाचनानेच व्यक्तिमत्त्व समृद्ध होते : तहसीलदार रमेश पवार*

​*शिरगावच्या कर्ले महाविद्यालयात ‘उत्सव माय मराठीचा’ उत्साहात साजरा*

*शिरगाव : संतोष साळसकर*

स्पर्धा परीक्षांचे युग कितीही विस्तारले असले तरी केवळ अभ्यासक्रम वाचून यश मिळत नाही. त्यासाठी अवांतर वाचनाची जोड आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयांपासून वाचनाची सुरुवात करावी आणि मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडून वाचनासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांनी केले.

देवगड तालुक्यातील ​शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त आयोजित ‘उत्सव माय मराठीचा’ या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम होते. यावेळी व्यासपीठावर विकास समिती सदस्य डॉ. राजेंद्र चव्हाण, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, प्राचार्य समीर तारी, मराठी विभाग प्रमुख सिद्धी कदम मराठी वाङ्मय मंडळ अध्यक्ष प्रसाद कदम,
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार पवार पुढे म्हणाले की, सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे ही काळाची गरज आहे. तरुणांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे, जेणेकरून त्यांना आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. याप्रसंगी त्यांच्या हस्ते ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन आणि मराठी बोलीभाषांवर आधारित भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. यामध्ये ‘मराठी थोरवी’ गीत, ओवी, पोवाडा आणि फुगडी अशा लोककलांनी उपस्थितांची मने जिंकली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तसेच आंतरमहाविद्यालयीन ‘मराठी दिन रील स्पर्धे’तील विजेत्यांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका मयुरी कुंभार यांनी केले कार्यक्रमास प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!