*कोंकण एक्सप्रेस*
*महावितरणचा महाप्रताप ; ऐन परीक्षांच्या तोंडावर मीटर कापले ; विद्यार्थ्यांचा खोळंबा*
*कणकवली : प्रतिनिधी*
ऐन परीक्षांच्या तोंडावर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात महावितरणकडून अचानक मीटर कापण्याची कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी वीज बिल भरलेले असतानाही त्यांचे कनेक्शन तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
यामुळे परिसरातील अनेक घरे अंधारात गेली असून विशेषत: परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा खोळंब झाला आहे. ऐन अभ्यासाच्या काळातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत विचारणा केली असता काही वायरमनकडून ही कारवाई कार्यालयीन आदेशानुसार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की, बिल भरूनही मीटर कापले जाणे हा महावितरणचा बेजबाबदारपणा असून याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

