कणकवली शहरात सखोल स्वच्छता अभियानाला वेग

कणकवली शहरात सखोल स्वच्छता अभियानाला वेग

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली शहरात सखोल स्वच्छता अभियानाला वेग…*

*सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोहीम महत्त्वाची मुख्याधिकारी गौरी पाटील..*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सार्वजनिक स्वच्छता हे नगरपंचायतीचे प्राथमिक कर्तव्य असून ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरू असलेले सखोल स्वच्छता (डीप क्लिनिंग) अभियान हे केवळ नावलौकिकासाठी नसून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

ही स्वच्छता मोहीम लोकचळवळ बनावी यासाठी नगरपंचायतीकडून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून भविष्यातही ही मोहीम अधिक जोमाने राबविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या अभियानांतर्गत कणकवली ढालकाठी ते प्रांत कार्यालय परिसर, उड्डाणपुलाखालील भाग, मराठा मंडळ परिसर तसेच शहरातील इतर प्रमुख ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर संबंधित परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शहरात राहणाऱ्या व येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!