*कोंकण एक्सप्रेस*
*शिवतेजा मित्रमंडळाने कलमठची सांस्कृतिक परंपरा जपली
संदीप मेस्त्री : कलमठमध्ये शिवतेजा मित्रमंडळाचा शिवतेजा महोत्सव*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कलमठ गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शिवतेजा मित्रमंडळ शिवतेजा महोत्सवाच्या माध्यमातून गावाची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. मित्रमंडळाचा ‘शिवतेजा महोत्सव’ हा उपक्रम स्तुत्य आहे. मित्रमंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य, स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला माझे सर्वतोपरी सहकार्य राहील. कलमठ गाव स्वच्छतेच्या अभियनात सहभागी झाले असून गावातील सर्वच मित्रमंडळांनी ग्रा.पं.च्या स्वच्छता विषयक उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले.
शिवतेजा मित्रमंडळातर्फे कलमठ बाजारपेठ येथील पिंपळपार येथे शिवतेजा महोत्सवाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. मेस्त्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर, उपाध्यक्षा अनिता साळगावकर, नंदकुमार हजारे, प्रसाद कांबळी, मनोहर मेस्त्री, नारायण पारकर, राजाराम उर्फ बंडू दंताळ, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, विनोद कोरगावकर, संतोष चव्हाण, समीर कांबळी आदी उपस्थित होते.
श्री. मेस्त्री म्हणाले, पिंपळपार येथे सभामंडप उभारण्याची मागणी माझ्याकडे केली होती. मंडळाची ही मागणी मान्य झाली असून लवकरच पिंपळपार येथे सभामंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. गुरुनाथ वर्देकर म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून गावात विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कलमठ गावाचा सर्वांगीण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांनी सहकार्य करावे. गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुप्रिया मेस्त्री यांनी मंडळाच्या शिवतेजा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल मंडळाने घेत माझा सन्मान केल्याबद्दल अनंत हजारे यांनी मंडळाचे आभार मानले. मंडळातर्फे सुप्रिया मेस्त्री, गुरुनाथ वर्देकर, संदीप मेस्त्री यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सचिन कुवळेकर यांनी केले. यावेळी गावातील धार्मिक व सामाजिक काम करणाºया राजाराम उर्फ बंडू दंताळ, अनंत हजारे, विनोद कोरगावकर यांच्या मंडळातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. मंडळाला नेहमीच सहकार्य करणारे मनोहर मेस्त्री, नारायण पारकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी केले.

