नारी शक्तीचा जल्लोष! वेंगुर्ल्यात रंगणार भव्य महिला दिन कार्यक्रम

नारी शक्तीचा जल्लोष! वेंगुर्ल्यात रंगणार भव्य महिला दिन कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*नारी शक्तीचा जल्लोष! वेंगुर्ल्यात रंगणार भव्य महिला दिन कार्यक्रम*

*वेंगुर्ले न.प. च्या महिला व बालकल्याण समितीचे आयोजन*

*वेंगुर्ला: प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तर्फे दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे तसेच स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
कार्यक्रमाची संकल्पना “सक्षमीकरणातून परिवर्तन” या विचारांवर आधारित असून समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. महिलांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि यशोगाथांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. या दिनानिमित्त विशेष समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण १५ प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून ही स्पर्धा विशेषतः महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटामध्ये किमान ४ महिलांचा सहभाग अनिवार्य राहील. स्पर्धेचे विषय “एक स्त्री – अनेक रूपे”, “सक्षमीकरण आणि विविधता”, “नारी शक्तीचा गौरव” तसेच “स्त्री जीवनाचे विविध रंग” असे आहेत. प्रत्येक सादरीकरणाचा कालावधी ५ मिनिटे राहील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹ ५,०००/-, ₹ ३,०००/- व ₹ २,०००/- इतकी रोख पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
तसेच महिलांसाठी विशेष वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. “स्वच्छता अनुसरून विषय आणि स्त्री शक्ती” या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा असून स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या तसेच समाजपरिवर्तन घडविणाऱ्या महिलांचे विविध रूपांत सर्जनशील सादरीकरण या माध्यमातून करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठीही एकूण १५ प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹ ५,०००/-, ₹ ३,०००/- व ₹ २,०००/- इतकी रोख पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
वेंगुर्ला शहरातील सर्व महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महिला सशक्तीकरणाच्या या प्रेरणादायी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा ९१३००४८१०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन वेंगुर्ले न.प. महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे व विभाग प्रमुख निशा आळवे यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!