शिरगाव–निमतवाडी येथे हापूस बागांची गवारेड्यांकडून नासधूस

शिरगाव–निमतवाडी येथे हापूस बागांची गवारेड्यांकडून नासधूस

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगाव–निमतवाडी येथे हापूस बागांची गवारेड्यांकडून नासधूस*

*हवामान बदल आणि वन्यप्राणी उपद्रवामुळे शेतकरी दुहेरी संकटात*

*शिरगाव :संतोष साळसकर*

हवामानातील बदलामुळे हापूस बागायतदार आधीच संकटात असताना, फवारणीचा वाढता खर्च आणि मजुरांची टंचाई यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षीही सचिन नरे यांचे याच आंबा बागायतीचे गवारेडयांनी नुकसान केले होते.
देवगड तालुक्यातील शिरगाव–निमतवाडी येथील सायामळी मठ परिसरात बागायतदार सचिन नरे यांची बाग असून, त्यामध्ये १७० हापूस आंबा व सुमारे ३०० काजूची सोळा वर्षांची कलमे आहेत. या बागेत रविवारी रात्री गवारेड्यांनी बागेचे कुंपण तोडून आत येऊन आंब्याच्या झाडांच्या खालच्या बाजूला असलेले सर्व आंबे खाऊन फस्त केले.
गवारेड्यांच्या धुडगुसात झाडावरील सुमारे दहा पेट्या तयार हापूस आंबे नष्ट झाले असून, अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गवारेड्यांनी बागेत सर्वत्र संचार केल्याने ठिकठिकाणी त्यांच्या पावलांचे ठसे दिसून येत आहेत. त्यांनी आंबे खाऊन अनेक आंबे जमिनीवर पाडले असून, आंब्याच्या कलमांच्या बुंध्या जवळील साल काढून मोठमोठ्या फांद्या तोडून मोडून टाकल्या आहेत. तसेच बागेचे कुंपणही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व प्रकारामुळे सचिन नरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून या परिसरात गवारेड्यांचा वावर वाढला असून, त्यामुळे बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲटमबॉम्ब, स्पीकर व भोंगे वाजविणे यांसारखे उपाय करूनही गवारेडे काहीच प्रतिसाद देत नसल्याने बागेत जाणे धोकादायक बनले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट व वनरक्षक मिठबाव आप्पासो राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळावे, अशी ठाम मागणी निमतवाडी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!