*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली-वैभववाडीत मोबाईल व्हॅन लोकअदालत व कायदेविषयक जनजागृती शिबीरातून ‘न्याय थेट जनतेच्या दारी’*
*कणकवली ः संजना हळदिवे*
ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग–ओरोस तसेच तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. शुभम गोविंद लटूरिया, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कणकवली तथा दिवाणी न्यायाधीश, कणकवली यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कणकवली व वैभववाडी तालुक्यांमध्ये दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत न्याय पोहोचावा, तळागाळातील व्यक्तींना कायद्याची ओळख व्हावी व त्यांना त्यांच्या हक्कांबाबत योग्य माहिती मिळावी, या सामाजिक व लोकाभिमुख उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर कालावधीत जिल्हा परिषद शाळा, हरकुळ खुर्द, ग्रामपंचायत तळेरे, ग्रामपंचायत सांगुळवाडी व ग्रामपंचायत भिरवंडे येथे मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत भिरवंडे व ग्रामन्यायालय, वैभववाडी येथे मोबाईल व्हॅन लोकअदालत घेण्यात आली. या उपक्रमांमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, महिलांचे व बालकांचे हक्क, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच मोफत विधी साहाय्य याबाबत सविस्तर व उपयुक्त माहिती मिळाली. लोकअदालतीमुळे अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली निघून नागरिकांना जलद, सुलभ व खर्चिक टाळणारा न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला.
या संपूर्ण उपक्रमात शुभम गोविंद लटूरिया यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीज्ञ श्री. एम. एम. सावंत, विधीज्ञ श्री. पी. पी. रावराणे, विधीज्ञ श्री. प्रताप सुतार, विधीज्ञ श्री. अजितसिंह काळे, विधीज्ञ श्रीमती जी. डी. मालवणकर, विधीज्ञ श्रीमती पी. पी. मांजरेकर, विधीज्ञ श्रीमती रेखा सावंत व विधीज्ञ श्रीमती स्वाती तेली यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, लोकाभिमुख व समजेल अशा भाषेत कायदेविषयक मार्गदर्शन केले. सर्व विधीज्ञांनी दाखविलेली तळमळ, अनुभव व सामाजिक बांधिलकी उपस्थित नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात न्यायालयीन कर्मचारीवर्गाचाही मोलाचा वाटा राहिला. सौ. एम. एम. आचार्य, वरिष्ठ लिपीक, श्री. एस. व्ही. सावंत, कनिष्ठ लिपीक तसेच श्री. पी. डी. सावंत, चपराशी यांनी कार्यालयीन कामकाज अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व तत्परतेने पार पाडून उपक्रम यशस्वी केला. त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत व सुरळीतपणे मिळाल्या.
या उपक्रमाविषयी आपले मत व्यक्त करताना शुभम गोविंद लटूरिया यांनी सांगितले की, “न्याय हा केवळ न्यायालयाच्या चार भिंतींत मर्यादित न राहता तो थेट जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. मोबाईल व्हॅन लोकअदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण होतो, त्यांना स्वतःचे हक्क व कर्तव्ये समजतात आणि वादाऐवजी समेटाचा मार्ग स्वीकारला जातो.”
या यशस्वी उपक्रमामुळे कणकवली व वैभववाडी तालुक्यांतील नागरिकांमध्ये न्यायप्रणालीविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन “न्याय सर्वांसाठी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

