देवगड जामसंडे नगरपंचायतीचा ७७ लाखांचा ‘शिल्लकी’ अर्थसंकल्प सादर

देवगड जामसंडे नगरपंचायतीचा ७७ लाखांचा ‘शिल्लकी’ अर्थसंकल्प सादर

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड जामसंडे नगरपंचायतीचा ७७ लाखांचा ‘शिल्लकी’ अर्थसंकल्प सादर*

*६० कोटींच्या जमा-खर्चाचे नियोजन*

​*भांडवली विकासासाठी ५२ कोटींची भरीव तरतूद :पायाभूत सुविधांवर भर*

*​देवगड (प्रतिनिधी)*

देवगड जामसंडे नगरपंचायतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ६० कोटी ५८ लाख ६१ हजार ९६९ रुपयांच्या जमेचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सर्व खर्च वजा जाता वर्षअखेर ७७ लाख २२ हजार ९६९ रुपये शिल्लक दर्शवण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प ‘शिल्लकी’चा सादर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यावर्षीच्या अर्थसंकल्पात निवडणूक खर्चासाठी २५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे गटप्रमुख नितीन बांदेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. एकावेळी २५ लाखाची तरतूद करण्यापेक्षा दरवर्षी पाच लाखाची तरतूद केली असती तर एवढ्या कमी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ आली नसती असे सुनावले.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक विशाल मांजरेकर, सुधीर तांबे, नितीन बांदेकर, चंद्रकांत कावले, संतोष तारी, शरद टूकरूल, नगरसेविका ॲड . प्रणाली माने, स्वरा कावले, मनीषा जामसंडेकर, रुचाली पाटकर आदी उपस्थित होते.

गतवर्षी पेक्षा ३० लाख ४५ हजार कमी शिलकीचा अर्थसंकल्प यावर्षी सादर करण्यात आला. यामध्ये आगामी निवडणूक खर्च तरतूद केल्याने विकास कामांसाठी निधी कमी झाला आहे.

​महसुली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्चावर भर

​या अर्थसंकल्पाचे भांडवली खर्चासाठी ५२ कोटी ९० लाख रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. शहरांमधील रस्ते, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तरतूद करण्यात आली आहे.

नगरपंचायतीने प्रशासकीय आणि महसुली खर्चावर नियंत्रण ठेवत जास्तीत जास्त निधी विकासकामांकडे वळवल्याचे दिसून येते आहे.

दरम्यान विरोधी गटनेता नितीन बांदेकर यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे प्रशासनाने उत्पन्नाचा विचार न करता मांडलेला आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी इतर कामांसाठी इंट्रेस्ट दाखवण्याऐवजी नगरपंचायतीचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष दिला पाहिजे होता. तसेच कोंडवाडा, भाजी मार्केट, मच्छीमार्केट यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देता येतो मात्र तो निधी वैयक्तिक लाभाच्या कामांकडे वळविला जात असल्याची टिकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!