भोसले फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात…*

*तीनशेहून अधिक जणांचा सहभाग; औषध संशोधनातील नव्या तंत्रज्ञानावर मंथन….*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “औषध शोध आणि विकासातील प्रगत तंत्रज्ञान” या विषयावर आठवी राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेच्या माध्यमातून औषध निर्माण शास्त्रातील संशोधनाचा एक नवा अध्याय उलगडला असून, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात अशा विविध राज्यांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी प्रास्ताविकातून औषधनिर्माण क्षेत्रातील आधुनिक बदलांचे महत्त्व स्पष्ट केले. रत्नागिरीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार बोथरा यांनी मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना, संशोधन प्रक्रियेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता कशी महत्त्वाची ठरत आहे, यावर प्रकाश टाकला. गोव्याच्या शासकीय महाविद्यालयातील डॉ. तितीक्ष देवळे यांनी एआय आणि मशीन लर्निंगमुळे औषध शोधण्याच्या पद्धतीत होत असलेल्या क्रांतिकारी बदलांची माहिती दिली, तर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर यांनी औषधनिर्मितीमधील सुरक्षा नियमावलीवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या परिषदेचे खास आकर्षण ठरली ती शोधनिबंध स्पर्धा. यामध्ये ६० पेक्षा अधिक विद्याथ्यांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. पदवी विभागात यशवंतराव भोसले कॉलेजच्या काजल आडणेकर हिने प्रथम, तर लोहित तावडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. पदविका विभागातही याच कॉलेजच्या मृण्मयी सावंत आणि मासिरा नदाफ यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळवले. पदव्युत्तर विभागात कोल्हापूरच्या भारती विद्यापीठाची जिज्ञासा पंतवालावलकर प्रथम आली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. नमिता भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. तुषार रुकारी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!