*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीतील काजू बागायतदारांना निसर्गाचा मोठा फटका….*
*तातडीने नुकसान भरपाई द्या; बागायतदारांच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. सततचे ढगाळ वातावरण, धुकं आणि वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे काजूचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. यामुळे हाताशी आलेले पीक जाण्याची भीती निर्माण झाल्याने तालुक्यातील काजू बागायतदार एकवटले असून, त्यांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांना साकडे घातले आहे.
तालुक्यातील बहुतांश कुटुंबांचे अर्थकारण हे पूर्णपणे काजू उत्पादनावर अवलंबून आहे. यंदा सुरुवातीला झाडांना मोहोर चांगला आल्यामुळे शेतकरी सुखावला होता आणि चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे चित्र पालटले आहे. मोहोराची गळ झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त बागांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बागायतदारांनी शासनाकडे प्रति हेक्टर किमान २ लाख ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची विनंती केली आहे. ही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी विनोद आयरे, राजू पवार, एकनाथ पवार, महेश रावराणे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

