*कोंकण एक्सप्रेस*
*पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा…*
*ओबीई’ प्रणालीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; महत्त्वांच्या बदलाबाबत सखोल माहिती…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष यांच्या वतीने ओबीई प्रणाली या विषयावर एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना आधुनिक शिक्षण प्रणालीतील महत्त्वाच्या बदलांबाबत सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भुपतसेन सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर परिसर संचालिका सौ. नुतन परब आणि डॉ. स्नेहा जगताप उपस्थित होत्या. या कार्यशाळेत डॉ. स्नेहा जगताप यांनी ‘ओबीई’ प्रणाली आणि ‘सीओ-पीओ मॅपिंग’ प्रक्रियेबाबत उपस्थित शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्रीकृष्ण मस्के यांनी एक्सेल आधारित प्रात्यक्षिकाद्वारे ‘अटेनमेंट गणना कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले.
या शिक्षक विकास कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन महाविद्यालयाच्या ‘नॅक’ आणि ‘एनबीए’ मानांकन प्रक्रियेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे संस्थेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

