*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ नगरपंचायतीचे ३७.९७ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर….*
*नगरपंचायतीची विशेष बैठक; स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससह शहर विकासावर दिला भर…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील नगरपंचायतीचे या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, ३७ कोटी ९७ लक्ष ०८ हजार ५९९ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी हे अंदाजपत्रक सभागृहात सादर केले. यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीच्या सभागृहात आज पार पडलेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर होत्या.
यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, लेखापाल स्वप्निल पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. लेखापाल स्वप्निल पाटील यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले.
अंदाजपत्रकातील आर्थिक आकडेवारीः या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिल्लक ३७ कोटी ८१ लक्ष ५९ हजार ८४८ रुपये असून, एकूण महसुली जमा १० कोटी ३० लक्ष ५२ हजार ५०० रुपये आहे. महसुली खर्च १० कोटी २७ लक्ष ४१ हजार ७४९ रुपये इतका अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच भांडवली जमा २५ कोटी ४४ लक्ष ५६ हजार ५०० रुपये आणि भांडवली खर्च २५ कोटी ३२ लक्ष १८ हजार ५०० रुपये असून, अखेर ३७ लाख ९७ हजार रुपयांची शिल्लक दर्शवणारा हा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे.
शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी, जलतरण तलाव, नाट्यगृह बांधकाम आणि सुसज्ज जिमखाना यांचा समावेश आहे. तसेच शहराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, नवीन उद्याने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ यासाठीही विशेष निधीची तरतूद केली आहे.
पाणीपुरवठा योजना, मल्लनिस्सारण योजना, कचरा डेपोचे आधुनिकीकरण, बायोगॅस प्लॅन्ट आणि नवीन कचरा संकलन वाहने खरेदी करून स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय भाजी मार्केट आणि मच्छी मार्केटच्या विकासासाठीही तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण आणि दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठीही या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना हे अंदाजपत्रक पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

