*कोंकण एक्सप्रेस*
*विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन*
*कोल्हापूर दि २५ :*
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेला ३ ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून, तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमा निमित्त निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धन व समृद्धी या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, कवी तसेच भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे.

