*कोंकण एक्सप्रेस*
*बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ विषयावर उद्या राष्ट्रीय परिसंवाद; नामवंत तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी : प्रथमेश गुरव*
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात उद्या गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सेल’ अंतर्गत हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन उद्या सकाळी ठीक ९:३० वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. प्रा. जयकुमार देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मंजिरी अजितराव मोरे, पेट्रोन कौन्सिल मेंबर श्री. दौलतराव देसाई, संस्था कौन्सिल सदस्या मा. श्रीमती अंजली देसाई, संस्था प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय परिसंवादात तीन महत्त्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे:
प्रथम सत्र (बीजभाषक): डॉ. संतोष पाटकर (प्राचार्य, सारस्वत कॉलेज, मापुसा-गोवा)
द्वितीय सत्र: डॉ. किरणकुमार बोंदर (सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, कोकण विभाग, पनवेल)
तृतीय सत्र: डॉ. रेखा जाधव (विभागप्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय, नाशिक)
दिवसभर चालणाऱ्या या बहुविद्याशाखीय परिसंवादाचा समारोप प्राचार्य डॉ. संतोष पाटकर व प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या उपस्थितीत होईल. या परिषदेत देशभरातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणार आहेत.
या परिसंवादाचे नियोजन समन्वयक प्रा. डी. बी. राणे आणि सहसमन्वयक प्रा. बी. एम. भैरट यांनी केले असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

