*कोंकण एक्सप्रेस*
*प्रवासी वाहतूक करणारी बोट सर्वसामन्यांना परवडणारी नाही…*
माजी आ. परशुराम उपरकरः विमानाच्या नाईट लैंडिंग परवानगीचा गाजावाजा झाला, मात्र मुंबई विमान सेवा अद्याप सुरु झालेली नाही..
*कणकवली ः संजना हळदिवे*
प्रवासी बोट सेवा सुरू करण्याच्या घोषणेबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून बोट सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी या सेवेचे तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ३ हजार, ५ हजार आणि ७ हजार रुपये इतके तिकीटदर असतील, तर सामान्य चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ कसा घ्यायचा? असा सवाल त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात असताना, त्याच वेळेत बोटीने प्रवास करून पुढे विजयदुर्गहून बसने कणकवलीला यावे लागणार असेल, तर ही सुविधा कितपत सोयीची ठरेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतून भाऊच्या धक्क्यावर जाण्यास लागणारा वेळ, त्यानंतरचा ६-७ तासांचा सागरी प्रवास आणि पुढील बस प्रवास यामुळे एकूण प्रवास अधिक कष्टदायक होणार नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच या बोटीने नेमके किती प्रवासी येणार, पुढील नियोजन काय, याची स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विमानाच्या नाईट लैंडिंग परवानगीचा गाजावाजा झाला, मात्र मुंबई विमान सेवा अद्याप सुरू झालेली नाही. २५०० रुपयांत मुंबई विमान प्रवासाची घोषणा झाली होती, ती प्रत्यक्षात कधी येणार, हा सामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचेही उपरकर यांनी नमूद केले. केवळ घोषणा न करता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि सोयीस्कर सुविधा द्याव्यात, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

