*कोंकण एक्सप्रेस*
*पोखरण गावचे माजी सरपंच विजयसिंग तावडे यांचे निधन*
*कणकवली : प्रतिनिधी*
ज्येष्ठ समाजसेवक , पोखरण गावचे माजी सरपंच विजयसिंग बळीराम तावडे (वय ८५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या अखेरपर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत होते. गावाचा विकास व्हावा, गावात एकोपा नांदावा यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते सातत्याने मार्गदर्शन करीत. ते गेली ४० वर्षे नियमित माघवारी करायचे. परम विठ्ठल भक्त असल्याने आपला वाधर्क्यकाळ लक्षात घेत आपल्याला आता वैकुंठात जायचे वेध लागले आहेत, आता आपल्याला पंढरीला देहाने येणे शक्य होत नाहीय असे सांगत माघ महिन्याच्या जया एकादशीपासून त्यांनी अन्नत्याग केला. महाशिवरात्रीच्या उत्सवापर्यंत गावातील प्रत्येकाची विचारपूस करत त्यांनी सोमवारी देह ठेवला.
पोखरण गावाचे १५ वर्ष त्यांनी सरपंच,उपसरपंच पद भुषविताना गावाचा विकास अग्रक्रमाने करतानाच गावात प्राथमिक बरोबरच माध्यमिक विद्यालय सुरु व्हावे यासाठी मेहनत घेतली. शाळेची नवी इमारत होण्यापुर्वी आपल्या घरातच विद्यालय उभे करत ज्ञानदानाचा वसा खंडीत होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
गावातील नव्या पीढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालये बांधतानाच ग्रंथ वाचन परंपरा सुरु केली ती आजपावेतो सुरु आहे. सोमवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा निरोप घेतला.त्यांच्यावर पोखरण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार महिन्याभरापुर्वीच त्यांना देऊन सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुना ,नातवंडे, मुली, जावई , पुतणे असा मोठा परिवार आहे. शिवसेना आंब्रड उपविभाग प्रमुख प्रशांत तावडे यांचे ते वडील होत.

