*कोकण Express*
*ऑक्सीजन प्लांटसाठी अगोदर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी-परशुराम उपरकर…..*
*कणकवली/प्रतिनिधी*
नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सिंधुदुर्गमध्ये ही एका रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित असून अन्य दोन ठिकाणी ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. मात्र काही समस्या निर्माण झाल्यास ती तात्काळ सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अगोदर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. कुडाळ येथील महिला रुग्णालयातही ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यात येत असून अन्य दोन उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांट असणे आवश्यक आहे. मात्र हे करताना काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर ती सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. नुसते प्लांट होऊन उपयोग नाही तर तेथे तांत्रिक कर्मचारी ही तेवढ्याच क्षमतेने दिवस-रात्र कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने व्हेंटिलेटर व्यवस्थाही ज्या रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणीही व्हेंटिलेटरची तांत्रिक देखभाल-दुरुस्ती करण्यासाठीची एजन्सी नेमणे आवश्यक आहे. प्लांट सुरू केले म्हणजे झाले नाही तर काही समस्या निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी तज्ञ मंडळी त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. नाशिक येथील दुर्दैवी घटने नंतर प्रशासनाने या गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक तंत्रज्ञ मंडळींची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणीही श्री. उपरकर यांनी केली आहे.