आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून घराघरात मिळणार आरोग्य सेवा

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून घराघरात मिळणार आरोग्य सेवा

*कोंकण एक्सप्रेस*

*आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून घराघरात मिळणार आरोग्य सेवा..*

*ओरोस ता १७*

राज्यात वाढते कर्करोग, हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा’ची व्याप्ती वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे, तर ‘आरोग्यवर्धिनी केंद्रां’च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी जाऊन आवश्यक सेवा पुरविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत २ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनेकदा ‘पॅलिएटिव्ह केअर म्हणजे केवळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील सेवा असा समज असतो. मात्र, शासनाच्या नवीन निर्णयानुसार, आता आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांच्या संपूर्ण कालावधीत रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आधार दिला जाईल, याचा उद्देश रुग्णाचे जीवन सुसह्य करणे आणि वेदना कमी करणे हा आहे, असे म्हटले आहे.

मोफत औषधे आणि ‘होम केअर किट’:

तीव्र वेदना कमी करण्यासाठी ‘मॉर्फिन’ सारखी औषधे आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करून दिली जातील. तसेच, घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी विशेष ‘होम केअर किट’ पुरविले जाईल, ज्यामध्ये ड्रेसिंग साहित्य, आवश्यक औषधे आणि उपकरणांचा समावेश असेल.

73

रुग्णालयांमध्ये राखीव खाटाः

जिल्हा रुग्णालयात ४ ते ६ खाटा, तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात किमान २ खाटा ‘पॅलिएटिव्ह केअर’ रुग्णांसाठी राखीव असतील. तसेच आठवड्यातून एकदा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग चालवला जाईल.

या आजारांचा आहे समावेश

कर्करोग, अर्धांगवायू, पार्किन्सन, किडनी किंवा यकृत निकामी होणे, दीर्घकालीन श्वसन विकार, वृद्धापकाळातील अशक्तपणा आणि इतर दुर्धर आजार यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

समुपदेशन आणि प्रशिक्षणः

केवळ रुग्णच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांना आणि काळजीवाहूंना रुग्णाची काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण आणि मानसिक आधार दिला जाईल. २४ तास मदतवाहिनी सुरू राहणार आहे. रुग्णांच्या मदतीसाठी ‘१०८/१०२’ रुग्णवाहिका सेवेसोबतच, ‘साथ-साथ’ (१८००-२०२-७७७७) आणि मानसिक आरोग्यासाठी ‘टेलीमानस’ (१८००-८९-१४४१६) या टोल-फ्री क्रमांकांची सुविधा उपलब्ध असेल. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांचा शासनातर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना, त्यांच्या राहत्या घरीच सन्मानाने जगण्यासाठी आणि वेदनामुक्त उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!