*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग येथे हत्तींचा थरार — मुलाने जीव धोक्यात घालून वडिलांचे प्राण वाचवले*
*दोडामार्ग,: शुभम गवस*
: घोटगे गावातील काजू बागेत काम सुरू असताना अचानक सहा हत्तींचा कळप समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. या थरारक प्रसंगात ८० वर्षीय शेतकरी आत्माराम दळवी हत्तीच्या कचाट्यात सापडणार इतक्यात त्यांचे पुत्र भरत दळवी यांनी जीवाची पर्वा न करता वडिलांना उचलून सुरक्षित स्थळी नेले. नशिब बलवत्तर असल्यामुळे दळवी कुटुंब व त्यांच्यासोबत काम करणारे कामगार या संकटातून सुखरूप बचावले.
दरम्यान, या गोंधळात दोन महिला शेतकरी जमिनीवर पडल्याने जखमी झाल्या. संतापलेल्या हत्तीने काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत बाग उद्ध्वस्त केली.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात हत्तींचा वावर वाढला असून शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. या घटनेची माहिती देऊनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप भरत दळवी यांनी केला आहे. वनविभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

