*कोंकण एक्सप्रेस*
*हळबे महाविद्यालयास ‘आय.सी.टी. एनेबल्ड क्लासरूमसाठी’ सडेकर कंपनीचे अर्थसहाय्य*
*दोडामार्ग: शुभम गवस*
शिक्षण व्यवस्थेमध्ये बदलत्या काळानुसार पारंपरिक अध्यापन पद्धतीसोबत आय.सी.टी. साधनांचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. आय.सी.टी. साधनांच्या माध्यमातून अध्यापन–अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक, संवादात्मक व विद्यार्थी-केंद्रित होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना अशा आधुनिक सुविधा सहज उपलब्ध होत असल्या, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या आजही मर्यादित स्वरूपात मिळतात.
दोडामार्ग परिसरातील विद्यार्थ्यांनीही अत्याधुनिक पद्धतीचे, गुणवत्तापूर्ण व काळाशी सुसंगत शिक्षण घ्यावे, या उद्देशाने दोडामार्गचे सुपुत्र व सडेकर एनवायरो इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. कृष्णा राघोबा सडेकर व श्री. प्रभाकर राघोबा सडेकर यांनी कंपनीच्या सी.एस.आर. अंतर्गत महाविद्यालयास आय.सी.टी. एनेबल्ड क्लासरूम उभारणीसाठी अर्थसहाय्य केले आहे. यामध्ये एल.जी. कंपनीचा ७५ इंचांचा इंटरॲक्टिव्ह पॅनल, एक संगणक, आहुजा कंपनीची उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम तसेच ३५ व्हिजिटर खुर्च्या असे सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित आवश्यक साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
या आय.सी.टी. एनेबल्ड क्लासरूमचे उद्घाटन गोव्यातील डिचोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कंपनीचे संचालक प्रभाकर सडेकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, सदस्य मृत्युंजय खातू, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. हेमंत पेडणेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील तरुणांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा यावेळी प्रभाकर सडेकर यांनी व्यक्त केली. तसेच “ज्या भूमीत आपण जन्मलो, शिकलो व वाढलो, त्या भूमीचे काहीतरी देणे लागतो” या सामाजिक भावनेतून हे योगदान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, दोडामार्ग तालुक्यातील अनेक तरुणांना सडेकर यांनी कंपनीत रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सडेकर बंधूंच्या या दातृत्वाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या क्लासरूमच्या उभारणीसाठी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सोपान जाधव यांनी विशेष प्रयत्न करून सडेकर कंपनीसोबत प्रभावी समन्वय साधला, तर साहित्य खरेदीसाठी योगेश ठाकूर यांनी मोलाची भूमिका बजावली.

