*कोंकण एक्सप्रेस*
*शिंदे गटाच्या सायली निंबाळकर यांची दमदार एंट्री; कोनाळमध्ये प्रचाराला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद”*
*दोडामार्ग: शुभम गवस*
कोनाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौं. सायली निंबाळकर यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि वेगवान होताना दिसत आहे. सध्या त्या मतदार संघातील गावोगाव जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत असून सर्व स्तरातील नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. महिला मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच तरुणांशी संवाद साधत त्या आपल्या प्रचाराला धार देताना दिसत आहेत.
सौं. सायली निंबाळकर या राजकारणात नविन चेहरा असल्या तरी त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांची जाण आणि मतदार संघातील विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका मांडताना त्यांचा आत्मविश्वास दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत असल्याचे चित्र सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे.
गावोगावी घेतल्या जाणाऱ्या सभा, पदयात्रा आणि नागरिकांशी साधला जाणारा थेट संपर्क यामुळे त्यांच्या प्रचाराला वेग मिळत आहे. विशेषतः महिला वर्ग आणि तरुण मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
दरम्यान, कोनाळ मतदार संघात विविध पक्षांचे उमेदवार मैदानात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत सौं. सायली निंबाळकर यांचा वाढता प्रचार आणि मतदारांशी साधलेला संपर्क हा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

