*कोंकण एक्सप्रेस*
*कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक तापली*
*दोडामार्ग: शुभम गवस*
कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
साक्षी देसाई सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत असून त्यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधक दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना साक्षी देसाई म्हणाल्या, “जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळत असल्यामुळे काही विरोधक घाबरले आहेत. मला धमक्या देऊन घाबरवण्याचा प्रयत्न होत असला तरी मी मागे हटणार नाही. जनतेसाठी शेवटपर्यंत लढत राहणार आहे.”
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या घटनेमुळे मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

