*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन चेहरा, नवा संकल्प; सोनिया नाईकांचा विकासमार्ग*
*दोडामार्ग : शुभम गवस*
मणेरी पंचायत समिती मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सौं. सोनिया अंकुश नाईक (कुबल) यांचे नाव पुढे येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्या सक्रिय भाजप युवक कार्यकर्ते अंकुश गुरुनाथ नाईक यांच्या पत्नी असून, नाईक कुटुंबाचा सामाजिक व राजकीय वारसा या उमेदवारीला बळ देणारा ठरत आहे.
अंकुश नाईक यांचा मणेरीसह परिसरातील गावांमध्ये युवक वर्गात चांगला प्रभाव असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना व्यापक जनसमर्थन लाभले आहे. तसेच त्यांचे वडील गुरुनाथ नाईक यांनी उपसभापती पद भूषवले असल्याने, नाईक कुटुंबाचे वयस्कर मतदारांशीही जिव्हाळ्याचे नाते आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत जपलेले हे संबंध नव्या पिढीला नवी ओळख मिळवून देणारे ठरत आहेत.
राजकारणात नवे आणि ताजे चेहरे येणे ही काळाची गरज असून, आजची नवी पिढी देश व समाज घडवण्याची क्षमता ठेवते. मात्र केवळ विचार नव्हे, तर आपल्या कर्तृत्वातून सभोवतालचे वातावरण सकारात्मक बदलण्याची जिद्द आवश्यक असते. याच विचारातून प्रेरित होऊन सौं. सोनिया नाईक यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
राजकारणात त्या जरी नवख्या असल्या, तरी काहीतरी वेगळे व नवे करून दाखवण्याचा ठाम संकल्प त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट दिसतो. मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर त्यांचा विशेष भर आहे.
स्थानिक प्रश्नांची जाण, जनतेशी थेट संवाद साधण्याची तयारी आणि नव्या नेतृत्वाची अपेक्षा यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सौं. सोनिया नाईक या मतदारसंघात नवीन पण प्रभावी चेहरा ठरतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

