*कोंकण एक्सप्रेस*
*सत्तेची नाही आस खुर्चीची; दीपक जाधवांची लढाई जनहिताची…*
*दोडामार्ग: शुभम गवस*
मणेरी पंचायत समिती मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, उद्यापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आपल्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत वाढत चाललेल्या खर्चिक राजकारणामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत, अशा प्रवृत्तीला छेद देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे जाधव यांनी सांगितले. निवडणुकीत होणाऱ्या अवाजवी खर्चाचा थेट परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत असून, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सन २००३ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले दीपक जाधव गेली दोन दशके विविध सामाजिक, नागरी व प्रशासकीय प्रश्नांवर लोकांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रशासकीय कामकाजाची चांगली जाण आणि अनुभवाच्या बळावर पंचायत समितीत जनतेसाठी ठामपणे उभा राहून प्रभावी काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत धर्म, जात, पंथ किंवा पक्षभेद न पाहता केवळ विकास, पारदर्शकता आणि जनसेवा या मुद्द्यांवर मतदारांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. “मी खुर्चीसाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
मतदारांनी विश्वास दाखवून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा आणि जनहिताच्या दृष्टीने परिवर्तनाची संधी द्यावी, असे आवाहन दीपक जाधव यांनी शेवटी केले.

