*कोंकण एक्सप्रेस*
*राजकारणात नवा चेहरा; सौं.सायली निंबाळकर यांचा कोनाळ मतदारसंघात व्यापक जनसंपर्क*
*दोडामार्ग: शुभम गवस*
कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौं. सायली स्वप्निल निंबाळकर या राजकारणातील नव्या चेहऱ्याच्या रूपाने मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट जनसंपर्कावर भर देत प्रचाराला वेग दिला आहे.
सध्या त्या तळा–गळाशी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत असून, घराघरांत भेटीगाठी घेत स्थानिक समस्या जाणून घेत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार, महिला व युवकांचे प्रश्न तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या या थेट संपर्कामुळे मतदारसंघात उत्सुकता व चर्चा वाढताना दिसत आहे.
महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करत असताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांचे सहकार्य त्यांना लाभत आहे. शांत, संयमी आणि मुद्देसूद पद्धतीने प्रचार करत विकासाभिमुख भूमिका मांडण्यावर त्यांचा भर आहे.
राजकारणात नव्याने प्रवेश करत असल्या तरी सामाजिक संपर्क, स्थानिक पातळीवरील समज आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काळात त्यांचा प्रचार अधिक व्यापक होण्याची शक्यता असून, कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक लढतीत सौं. सायली निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.

