भारताचे आधारस्तंभ वाचविण्यासाठी डोळस बना!-डॉ. सचिन परब

भारताचे आधारस्तंभ वाचविण्यासाठी डोळस बना!-डॉ. सचिन परब

*कोंकण एक्सप्रेस*

*भारताचे आधारस्तंभ वाचविण्यासाठी डोळस बना!-डॉ. सचिन परब*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुल्र्यात ड्रग्ससारख्या जीवघेण्या व्यसनाचा विळखा पडू लागला आहे. भारताचे उद्याचे आधारस्तंभ खिळखिळे बनविण्यासाठी विविध आमिषे देऊन त्यांना व्यसनाकडे वळविणारी एक अदृश विघातक शक्ती सक्रिय झाली आहे. या शक्तीपासून आपल्या घरातील मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने डोळस व्हायला हवे. आपल्या घरातील भावी पिढी सुरक्षित करावी, असे आवाहन प्रजापिता ब्राहृकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या व्यसनमुक्ती अभियानाचे संयोजक डॉ. सचिन परब यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला नगरपरिषद आणि माणिकचौक येथील प्रजापिता ब्राहृकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वेंगुर्ला शाखेच्यावतीने “टेंशन फ्री जीवन आणि व्यसनमुक्ती’ यावर नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात व्याख्यान आायोजित केले होते. याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, प्रजापिताच्या वेंगुर्ला केंद्राचे साधक शुभभाई, नगरसेवक अॅड.सुषाम प्रभूखानोलकर, गौरी मराठे, लिना म्हापणकर, रिया केरकर, पत्रकार महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते.
देशातील विद्यार्थी मोठ¬ा प्रमाणावर सायबर कल्चर व व्यसनांमध्ये गुरफटत चालला आहे. त्यांना आताच व्यसनांपासून दूर नाही ठेवले तर देशावर मोठे संकट कोसळणार आहे. या सर्वांचा विचार करूनच देशात मोठे नेटवर्क असलेल्या प्रजापिता ब्राहृकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयामार्फत जनजागृतीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती डॉ.सचिन परब यांनी दिली.
टेंशन घालविण्यासाठी नशापाणी करणारे लोक आपल्यासह आपले कुटुंब, समाज व देशाचेही नुकसान करतात. व्यसनामुळे वाममार्गाला प्रोत्साहन मिळते. त्यातून गुन्हेगारीलाही खतपाणी मिळते. म्हणून मी स्वतः व्यसन करणार नाही आणि सोबतच्या कोणालाच या व्यसानच्या आहारी जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करायला हवी, असेही डॉ. सचिन परब म्हणाले.
प्रजापिताचा हा उपक्रम भावी पिढी वाचविण्यासाठी अत्याश्यक आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरातील महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये लहान मुले व युवकांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम आम्ही प्रजापिताचे सहकार्य घेऊन राबवू, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनीही प्रजापिता ब्राहृकुमारीजमुळे आपल्या जीवनात कसे परिवर्तन झाले याचा उल्लेख करत टेंशन फ्री आयुष्यासाठी व्यसनमुक्ती किती गरजेची आहे यावर विवेचन केले. नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी डॉ. सचिन परब यांचा खास सन्मान केला. तर आभार शुभभाई यांनी मानले. या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे कर्मचारी, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, वेंगुर्ला हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!