*कोंकण एक्सप्रेस*
*अवजड वाहने धावतात, मग एसटीलाच बंदी का? फोंडाघाटमध्ये जिल्हाधिकारी, एसटी प्रशासन आणि बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार!*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
फोंडाघाट, हसणे आणि दाजीपूर परिसरात सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, एसटी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाअभावी सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. विशेषतः फोंडाघाट हायस्कूल आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या सुमारे १५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गेल्या २५ दिवसांपासून एसटी बंद असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
प्रशासनाचा अजब कारभार सुरू आहे. ब्रिज अजून पाडलेला नाही, तरीही एसटी बंद का?
घाटातून कंटेनर, ट्रॉलर, चिरा-वाळूच्या गाड्या आणि व्होल्व्हो सारखी अवजड वाहने सुरू असताना फक्त एसटीलाच लाल कंदील का दाखवला जातोय?
पर्यायी रस्ता सुस्थितीत असतानाही एसटी प्रशासन आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी झटकत आहेत.
एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय चढाओढ सुरू आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या आणि रुग्णांच्या या गंभीर प्रश्नावर स्थानिक प्रतिनिधी गप्प का? असा संतप्त सवाल मतदार विचारत आहेत. या गोंधळाचा फटका आगामी निवडणुकीच्या मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज एसटीच्या प्रशिक्षण वाहनाद्वारे वाहतूक निरीक्षक श्री. गोरे यांनी पर्यायी रस्त्याची पाहणी केली. या चाचणीनंतर एसटी वाहतूक सुरक्षित असल्याचा अहवाल मिळेल आणि उद्यापासून बस सेवा पूर्ववत होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे
“ब्रिज पाडला तरी सुरक्षित पर्यायी मार्गावरून एसटी सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवावी. जर पुन्हा एसटी बंद केली, तर विद्यार्थी, पालक, व्यापारी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा स्थानिक जनतेने दिला आहे.

