*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण भाजप-शिवसेना ‘एबी फॉर्म’ वाद अखेर मिटला*
*राणेंच्या मध्यस्थीनंतर शिंदे गटाचे उमेदवार अर्ज मागे घेणार*
*मालवण : सौ.संजना हळदिवे*
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये निर्माण झालेला ‘एबी फॉर्म’चा वाद अखेर मिटला आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वादाची पार्श्वभूमी
तालुक्यातील काही जागांवर भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे शिवसेनेने आपले ‘एबी फॉर्म’ दिले होते. यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. “भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून आम्ही तो सहन करणार नाही,” अशी आक्रमक भूमिका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. कणकवलीतील बैठकीत महत्त्वाचा निर्णय वाढता वाद लक्षात घेता, आज सायंकाळी कणकवली येथे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अर्ज मागे घेणार: भाजप उमेदवारांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले जातील. समज दिली जाणार: ज्यांनी अनधिकृतपणे एबी फॉर्म वाटले, त्यांना वरिष्ठ पातळीवरून समज दिली जाईल.
निलेश राणेंशी चर्चा: या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, महायुतीचा धर्म पाळला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
”नारायण राणे साहेबांच्या मध्यस्थीने हा वाद आता पूर्णपणे शमला आहे. महायुतीमधील समन्वयासाठी आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आम्ही एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ.”
— धोंडू चिंदरकर, भाजप तालुकाध्यक्ष या निर्णयामुळे मालवण तालुक्यातील महायुतीमधील पेच सुटला असून, आता भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

