*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत भाजपचा धमाका! ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का; सोनू सावंत यांची बिनविरोध निवड निश्चित*
*कणकवली: सौ. संजना हळदिवे*
कणकवली तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. बिडवाडीनंतर आता वरवडे पंचायत समिती गणातही भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साद्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सोनू सावंत यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाकरे गट आणि मनसेची माघार ..वरवडे पंचायत समिती गणात तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांनी रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या माघारीमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत आता एकमेव रिंगणात उरले आहेत. निवडणूक विभागाकडून अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, तांत्रिकदृष्ट्या त्यांची निवड आता निश्चित मानली जात आहे.
भाजपची हॅट्ट्रिक: तीन जागा बिनविरोध
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपने आतापर्यंत तीन जागांवर ‘बिनविरोध’ विजयाचा झेंडा फडकवला आहे:बिडवाडी पंचायत समिती: भाजपचा उमेदवार आधीच बिनविरोध.वरवडे पंचायत समिती: सोनू सावंत यांची निवड निश्चित. कोकिसरे पंचायत समिती (वैभववाडी): ही जागाही भाजपच्या खिशात बिनविरोध गेली आहे.
एकापाठोपाठ एक उमेदवार बिनविरोध निवडून आणत भाजपने ठाकरे गटाला त्यांच्या बालेकिल्ल्यात सलग दुसरा धक्का दिला आहे. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीच भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

