चाफेड – भोगलेवाडीतील श्री गायगोठण गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात

चाफेड – भोगलेवाडीतील श्री गायगोठण गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड – भोगलेवाडीतील श्री गायगोठण गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात*

*शिरगांव : संतोष साळसकर*

मोरया मोरया….गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात देवगड तालुक्यातील चाफेड – भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात 21 वा माघी गणेश जयंती उत्सव सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी असंख्य गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
यादिवशी सकाळी पुरोहित यांच्या हस्ते गणेश पूजन, विविध धार्मिक विधी, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली. यंदा श्री गणेश पूजनाचा मान संतोष सूर्यकांत भोगले व सौ. सलोनी संतोष भोगले यांना तर श्री सत्यनारायण महापूजेचा मान गुरुदास अनंत भोगले व सौ. पूजा गुरूदास भोगले या उभयताना मिळाला.
दुपारी महाआरती आणि तीर्थप्रसाद झाल्यानंतर सर्व भाविकांनी रात्रौ उशिरापर्यंत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर परिसरातील नामांकित संगीत भजने पार पडली. यात शिरगाव- निमतवाडी येथील श्री गांगेश्वर गुरुमाऊली भजन मंडळ, शिरगाव येथील प्रख्यात बुवा. प्रा. विलासराव ऐनापुरे, किंजवडे – पाडावेवाडी येथील श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, चाफेड घाडीवाडी येथील श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, भरणी – घाडीवाडी येथील ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांची संगीत भजने तर चाफेड -भोगलेवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ यांचे वारकरी भजन पार पडली. रात्री उशिरा लोकराजा कै.सुधीर कलिंगण यांचे नेरूर येथील श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ मंडळ ( संचालक – सिद्धेश कलिंगण ) यांचा ‘शतकग्रीव्ह संवाद’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या उत्सवाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, कणकवली महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, कणकवली माजी सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक तथा माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कलमठ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी आंगणे, देवगडचे माजी सभापती रविंद्र जोगल, माजी उपसभापती अमित साळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेड सरपंच महेश राणे, शिरगावचे माजी उपसरपंच राजेंद्र शेट्ये, भरणी सरपंच अनिल बागवे, साळशी माजी सरपंच सत्यवान सावंत, कुवळे तलाठी अनंत अंधारी, कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले या सर्वांचा देवस्थान कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, पोलीस पाटील संतोष सावंत आदी उपस्तित होते. मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तर ज्ञानेश्वर भोगले यांनी मंदिरामध्ये आकर्षक पर्णकुले सजावट केली होती. तसेच मंदिरच्या समोर सादर करण्यात आलेला ‘साईबाबांचा चलचित्र देखावा’ उपस्थित सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.
सूत्रसंचालन या गावचे सुपुत्र तथा आदर्श राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक हरकुळ बुद्रुक – नरडवे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी केले. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी महिलांचे हळदीकुंकू, तसेच विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तसेच या उत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी काकड आरती आणि ब्राह्मण भोजनाने करण्यात आली. श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान चे अध्यक्ष प्रफुल्ल परब, उपाध्यक्ष प्रशांत राणे, खजिनदार सचिन परब, सरचिटणीस संतोष भोगले व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी आलेल्या भाविकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!