*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात ‘जनशक्ती’ विरुद्ध ‘धनशक्ती’ असा सामना; महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ‘अंनत पीळणकर’ मैदानात!*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
महाविकास आघाडीच्या वतीने फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर झाली असून, हा लढा विकासासाठी आणि फोंडाघाटातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी असेल. गेली अनेक वर्षे सत्ता एकाच ठिकाणी राहिल्याने या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाच्या माध्यमातून आम्ही रिंगणात उतरलो आहोत, असा निर्धार महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पीळणकर यांनी व्यक्त केला.
प्रमुख नेत्यांचे मानले आभार
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना पीळणकर म्हणाले की, “शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाचे मी नक्कीच सोने करेन. अमित सामंत साहेबांनी मला दिलेला शब्द पाळला आणि वरिष्ठांकडे पाठपुरावा करून मला ही संधी मिळवून दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.”
फोंडाघाट मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न आणि अजेंडा घेऊन उतरणार रिंगणात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्यांवर बोट ठेवले.
शुद्ध पाणीपुरवठा: फोंडा गावात गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे, हा प्रश्न प्राधान्याने सोडवणार.
आरोग्य सुविधा: फोंडाघाट येथे ग्रामीण आरोग्य केंद्र व्हावे आणि तिथे सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार.
क्रीडा आणि महिला सबलीकरण: तरुणांसाठी सुसज्ज क्रीडा मैदान आणि महिलांसाठी प्रभावी सबलीकरण योजना राबवणार.
रस्त्यांचा निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार: देवगड-निपाणी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून त्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. सिमेंटचा कमी वापर आणि क्रशर पावडरचा वापर करून रस्ते बनवले जात आहेत. निवडून आल्यानंतर या कामाची चौकशी करून दर्जेदार रस्ते मिळवून देणार.
मतदारांना आवाहन
”ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. जिल्हा परिषदेसाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि लोरे-फोंडा या दोन पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीच्या ‘मशाल’ चिन्हावर शिक्का मारून आम्हाला विजयी करावे,” असे आवाहन पीळणकर यांनी सर्व मतदार बंधू-भगिनींना केले आहे.
यावेळी उपस्तिथ सुंदर पारकर गुरुजी,रा.श.प प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,फोंडा पंचायत समिती उमेदवार चैतन्य सावंत,कृषी ज़िल्हाध्यक्ष समीर आचरेकर,युवक तालुका अध्यक्ष नयन गावडे, संतोष टक्के, शिवसेना उ बा ठा उप तालुका प्रमुख संजना कोलते, शिवसेना विभाग प्रमुख विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी शरद पवार विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखा प्रमुख निलेश राणे, घोणसारी ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, कृष्णा एकावडे, अमित लाड,संतोष चव्हाण, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर आदी उपस्तिथ होते..

