माटणे जि.प. मतदारसंघात बदलाची तुतारी; रविकिरण गवस मैदानात.

माटणे जि.प. मतदारसंघात बदलाची तुतारी; रविकिरण गवस मैदानात.

*कोंकण एक्सप्रेस*

*माटणे जि.प. मतदारसंघात बदलाची तुतारी; रविकिरण गवस मैदानात..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष तथा खोक्रल गावचे सुपुत्र रविकिरण गवस यांनी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करत सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेपुढे थेट आव्हान उभे केले आहे. “विकास हवा तर बदल हवा” या ठाम भूमिकेसह स्थानिक, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी मतदारसंघात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकनेते शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुणे–बारामती परिसरात ज्या पद्धतीने विकासाची घडी बसवली गेली, त्याच धर्तीवर माटणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार करत रविकिरण गवस निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात उत्साह, चैतन्य आणि नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविकिरण गवस यांनी प्रदूषणकारी व नियमबाह्य उद्योग, पर्यावरण विषयक प्रश्न, मोकाट जनावरे, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा, वीज समस्या, रस्त्यांची नियमबाह्य खोदाई तसेच अपूर्ण पुलांच्या कामांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे दोडामार्ग प्रशासनाने चुकीच्या कामांवर तात्काळ कारवाई केल्याने त्यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे. त्यामुळे “फक्त प्रश्न मांडणारा नाही तर प्रश्न सोडवणारा नेता” अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
जनतेच्या ठाम मागणीचा सन्मान राखत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे लोकनेते सुरेश दळवी, कोकण अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली रविकिरण गवस यांनी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे.
रविकिरण गवस यांच्या उमेदवारीमुळे माटणे जि. प. मतदारसंघातील लढत अधिकच रंगतदार झाली असून “विकास हवा तर बदल हवा” या संदेशासह विकासाची तुतारी रविकिरणांच्या हाती देण्यासाठी मतदार सज्ज होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!