*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावा उत्साहात*
*आरोग्य आणि राष्ट्रप्रेम विषयी विशेष व्याख्याने : तळेरे शाखेच्या अध्यक्षपदी वामन ताम्हणकर यांची निवड*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले,*
तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक मेळावा तळेरे येथील श्री गांगेश्वर मंदिरात तळेरे माजी सरपंच चंद्रकांत तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. यावेळी पंचक्रोशीतील असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत तळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, तालुकाध्यक्ष अर्जुन रावराणे, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, वामन ताम्हणकर, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या या वयात आरोग्याची नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि ती कशी घ्यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर राष्ट्रप्रेमाबाबत बोलताना भालचंद्र मराठे यांनी राष्ट्र रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याची जाणीव करून दिली. तसेच, आपण असेच राहिलो तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या धोक्याची सूचना दिली असून त्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या याचीही सविस्तर माहिती दिली.
यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या शुभांगी शरद वरुणकर (तळेरे) आणि गजानन महादेव राणे (ओझरम) यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तर यावेळी तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी वामन ताम्हणकर यांची निवड करण्यात आली.
*विरंगुळा केंद्र मंजूर*
तळेरे गांगेश्वर मंदिर परिसरात प्रशस्त असे विरंगुळा केंद्र मंजूर झाले असून गेल्या अनेक वर्षांपासूनची ज्येष्ठ नागरिकांची मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती सरपंच हनुमंत तळेकर आणि दिलीप तळेकर यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना चंद्रकांत तळेकर म्हणाले की, आम्ही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाला सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहोत. या ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रमही तेवढेच या सर्व ज्येष्ठांना एकत्र करण्यासाठी महत्वाचे ठरत आहेत. या मेळाव्याला तळेरे, कासार्डे, साळीस्ते, ओझरम, दारुम, शिडवणे येथून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सुरेश पाटणकर यांनी केले. तर हा मेळावा यशस्वी होण्यासाठी विजय सावंत, दिलीप मुद्राळे, अरुण भांबुरे, मोहन खानविलकर यांनी विशेष प्रयत्न केले.

