*सुधारतोय भजनाचा रंग.. ! मुंबईत रंगली कोकणातील दोन दिग्गज बुवांची पारंपारिक डबलबारी*

*सुधारतोय भजनाचा रंग.. ! मुंबईत रंगली कोकणातील दोन दिग्गज बुवांची पारंपारिक डबलबारी*

*कोंकण एक्सप्रेस*

*सुधारतोय भजनाचा रंग.. ! मुंबईत रंगली कोकणातील दोन दिग्गज बुवांची पारंपारिक डबलबारी*

*मुंबई भजनी यूट्यूबर्स मित्र परिवार यांचे आयोजन ; हजारोंहून अधिक भजनी रसिकांची उपस्थिती*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

मुंबई भजनी युट्युबर्स परिवार यांच्या वतीने “सुधारतोय भजनाचा रंग” या संकल्पनेतून न्यू एकता क्रीडा मंडळ, सांताक्रूझ मुंबई येथे कोकणातील दोन दिग्गज भजनी बुवांची पारंपरिक डबलबारीची भव्य जुगलबंदी पार पडली. पाळेकरवाडी, ता.देवगड जि. सिंधुदुर्ग येथील जेष्ठ भजनी बुवा विजय परब व कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील जेष्ठ भजनी बुवा लक्ष्मण गुरव यांच्या दमदार सादरीकरणाने प्रत्यक्ष कोकणकला भूषण कै. चंद्रकांत कदम बुवा व भजनमहर्षी कै. परशुराम पांचाळ यांच्या भजनाची अनुभूती पहायला मिळाली.
कै. परशुराम पांचाळ यांना नेहमी भजनात साथ सांगत करणारे तालमणी माऊली सावंत यांनी विजय परब बुवा यांना पखवाज साथ केली तर प्रमोद परब यांनी डगा तबला साथ केली. तसेच कै. चंद्रकांत कदम बुवा यांना नेहमी भजनात साथ सांगत करणारे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पखवाज वादक विजय पालव यांनी लक्ष्मण गुरव बुवा यांना पखवाज साथ केली तर श्रीकांत गुरव यांनी डगा तबला साथ केली. यावेळी हजारोंहुन अधिक भजनी रसिक प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमांची सुरुवात अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष भगवान लोकरे बुवा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व पंचरत्न बुवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी भजनी युट्युबर्स ऋषिकेश मेस्त्री, तुषार नलावडे, योगेश सुर्वे, रुपेश भितये, सूरज बाईत, हर्षल तेंडुलकर, राकेश मिशाळ, रोषण ढवन, चेतन केसरकर, सतिश चौककर, चंद्रकांत रासम तसेच नवनिर्वाचित नगरसेवक गितेश विनायक राऊत यांच्यासह अनेक भजनी कलाकार उपस्थित होते.

दोन्ही बुवांनी भजनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन केले व पारंपारिक बारीचा दम दाखवून दिला. यावेळी दोन्ही बुवा मार्गदर्शन करताना म्हणाले म्हणाले की, यू ट्यूब हे लोकांपर्यंत पोचण्याचे जास्त प्रभावी माध्यम आहे पण याचा चांगला उपयोग व्हायला हवा. गेल्या काही वर्षात कोकणात डबलबारीचा तोल घसरला. रसिक आणि मनोरंजन यांचे नियोजन करता करता भजनी बुवा विदुशक बनत आहेत. संत वचनांना तिलांजली देत भजनात हातवारे, पांचट संवाद, विनोद यातून भजनी रसिकांना हसवता हसवता खऱ्या भजनी परंपरेवर आघात होत आहे. लोकसंस्कृती आणि प्रबोधन या भक्ती माध्यमालाच गालबोट लागत आहे. स्मार्ट बनण्याच्या नादात शाब्दिक स्टंट करून भजन परंपरेला काळिमा फासण्याच्या प्रकाराला वेळीच थोपवलं नाही तर भजन संस्कृतीला वेगळं वळण लागेल. पूर्वी सांगितीक, वैचारिक डबलबारी व्हायच्या पण आताच्या डबलबारीत जिंकते ती विकृती आणि लोप पावते ती संस्कृती. २०×२० मध्ये चालणारे विडंबणं लोकसंस्कृतीला घातक आहे. भजन परंपरा टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. पंचरत्न बुवांचा भजनाचा वारसा जपने प्रत्येक कलाकारांचे आद्य कर्तव्य आहे. भजनाच्या माध्यमातून चांगले संस्कार दिले तर भजनासोबत हिंदू संस्कृती टिकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भजनी कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!