*कोकण Express*
*खारेपाटण बाजारपेठसह संपूर्ण गाव २२ एप्रिल २०२१ पासून पुढील आठ दिवस बंद*
*कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम सनियंत्रण समिती तसेच व्यापारी असोसिएशनने घेतला निर्णय*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सध्या महाराष्ट्र राज्यासह देशभर वाढत असलेला कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचे साखळी तोडण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे आज स्थानिक ग्राम सनियंत्रण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मिटिंगमध्ये खारेपाटण बाजारपेठसह संपूर्ण शहर बुधवार दि. २१एप्रिल रोजी रात्रौ १२ वाजल्यापासून ते गुरुवार दि.२९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत पुढील आठ दिवसांकरिता बंद ठेवण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला.
खारेपाटण गाव ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांचा अध्यक्षतेखाली खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झालेल्या या मिटिंगला उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचयत सदस्य महेंद्र गुरव, शमशुद्दीन काझी, योगेश पाटणकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष केतन आलते, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी पराग मोहिते, रमेश नारवर, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर,समितीचे सचिव तथा खारेपाटण तलाठी यु. वाय. सिंगनाथ, खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, महेश कोळसुलकर, पोलीस पाटील दिगंबर भालेकर, माजी पोलीस पाटील बाळा शेट्ये, मेडिकल सोसिएशनचे अनिल देवस्थळी, शेखर राणे, व्यापारी समितीचे सुधीर कुबल, संजय धाक्रस आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या मिटिंग मध्ये गुरुवार, दि.२२ एप्रिल पासून ते २९ एप्रिलपर्यंत पुढील ८ दिवस खारेपाटण बाजारपेठेसह संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा सामूहिक निर्णय एकमताने घेण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून मेडिकल स्टोअर्स व खाजगी दवाखाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे राहतील. तसेच दूध विक्रेत्यानी ग्राहकांना दूध घरपोच द्यावयाचे आहे. खारेपाटण ग्रामस्थ व व्यापारी या सर्वांनी मिळून घेतलेल्या या निर्णयाचे जो कोणी उल्लंघन करतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच खारेपाटण मधील रिक्षा व्यवसायिक तसेच अन्य छोटे-मोठे वाहतूक व्यवसायिक यानी देखील खारेपाटण बंदमध्ये सहभाग घेऊन पुढील आठ दिवस कोरोना साखळी तोडण्यास मदत करावयाचे असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
तर खारेपाटण बाजारपेठ पुढील आठ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे पार्श्वभूमीवर खारेपाटण दशक्रोशीतील आजूबाजूच्या गावातील ग्राहकांनी उद्याच्या येणाऱ्या मंगळवार व बुधवार या दोन दिवशी आपणाला लागणारे जीवनावश्यक साहित्य खारेपाटण बाजारपेठ मधून खरेदी करून ठेवावे असे आवाहन देखील स्थानिक ग्राम सनियंत्रण समितीच्या वतीने ग्राहकांना व नागरिकांना करण्यात आले आहे.
“सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोनाची महामारी यामुळे राज्यासह जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून कोरोनाची जलदगतीने वाढत असलेली साखळी तोडण्याच्या उद्देशाने व कोविड -१९ च्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी खारेपाटण गावात गुरुवार पासून पुढील आठ दिवस पूर्ण कडक लोकडाऊन जाहीर करण्यात आले असून याला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.कोरोना साखळी तोडण्यास मदत करावी.” यादरम्यान कोणी विनाकारण फिरल्यास, मास्क न लावता आढळल्यास तसेच कोणी आपली दुकाने आस्थापने उघडयाचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.असे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी सांगितले.