*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यात रंगला कबड्डीचा थरार : ‘सिंधुशौर्य’ अंतर्गत अभाविप सिंधुदुर्गचे आयोजन*
*दोडामार्ग : शुभम गवस*
खेळात ताकद, विचारात धार; युवाशक्तीचा संकल्प, राष्ट्रसेवेचा आधार हे ब्रीद घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘सिंधुशौर्य’ अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावातील देव खंडोबा मंदिर परिसरात ही स्पर्धा पार पडली.
‘कबड्डीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून त्यातील पहिली स्पर्धा म्हणून या कबड्डी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून अनेक नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये यंगस्टार कणकवली संघाने प्रथम क्रमांक, तर जय मानसिश्वर वेंगुर्ला संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय उत्कृष्ट पकडपटू, उत्कृष्ट चढाईपटू आणि अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व दोडामार्ग कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेला सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, विभाग संयोजक अर्थव शृंगारे, दोडामार्ग शहर अध्यक्ष प्रा. अनुराग सिनारी, शहर मंत्री मयूर तर्पे, कार्यक्रम प्रमुख रावसाहेब देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सहसचिव विजयकुमार साळुंखे, दोडामार्ग कबड्डी असोसिएशनचे खजिनदार संदीप गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

