*कोंकण एक्सप्रेस*
*कुंभारमाठचा सुपुत्र भारतीय सैन्यात! अमोल चौगुले यांच्या निवडीने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा*
*मालवण -कुंभारमाठ: प्रतिनिधी*
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कुंभारमाठ गावचे सुपुत्र श्री. अमोल बाबुराव चौगुले यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामीण भागातील तरुणांपुढे आदर्श अमोल यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. सैन्य दलातील खडतर परीक्षा आणि शारीरिक चाचणीमध्ये यश मिळवून त्यांनी आपली देशसेवेची जिद्द सिद्ध केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कुंभारमाठ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गावात जल्लोष अमोल चौगुले यांच्या निवडीची बातमी गावात समजताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. “अमोलने केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अमोल चौगुले यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा..!

