*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव येथून माघवारी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान*
*विठ्ठलनामाच्या गजरात सलग सातव्या वर्षी पायी वारीचा भक्तीमय प्रारंभ*
*शिरगांव/ संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव येथे गुरुवारी पहाटेपासून विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. टाळ-मृदुंगाच्या निनादात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात शिरगाव वारकरी संप्रदायाची माघवारी पायी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे यंदा सलग सातव्या वर्षी प्रस्थान झाली.
शिरगावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून माघवारी पायी दिंडीच्या मंगलमय प्रवासाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला. त्यानंतर शिरगाव बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात हरिपाठ व आरती संपन्न झाली. मंदिराला प्रदक्षिणा घालल्यानंतर दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.यावेळी ग्रामस्थ, वारकरी, भक्तगण, उपस्थित मान्यवर तसेच सुवासिनींनी माऊलींना औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
ही दिंडी शिरगाव बसस्थानकाजवळ पोहोचल्यानंतर
‘दिंडी चालली… चालली… पंढरपुरा…’,
‘हरि मुखे म्हणा…’
अशा अभंगांच्या गजरात वारकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला. विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
माघवारी दिंडीने शिरगाव येथील ओम गणेश मंदिर, आंबेखोल येथील शिवाजी चौक, श्री देव कापीचा चाळा, हडपिड येथील श्री गणेश मंदिर व स्वामी समर्थ मठ, तसेच कोळोशी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे थांबून आरतीचे कार्यक्रम पार पाडले.
दिंडी नांदगाव येथे दुपारी पोहोचल्यानंतर प्रमोद लोके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दिंडीने कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ येथे मुक्कामासाठी प्रस्थान केले. ही पायी दिंडी गगनबावडा – कोल्हापूर – जयसिंगपूर फाटा – मिरज – कवठे महाकाळ – कमलापूर – पंढरपूर असा मार्गक्रमण करणार आहे. शिरगाव येथून १५ जानेवारी रोजी सुरू झालेली ही दिंडी २६ जानेवारी रोजी रात्री पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दिंडीतील वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा हे या दिंडीचे खास आकर्षण ठरले आहे.
संतांनी दिलेली समता, बंधुत्व व मानवतेची शिकवण पुढील पिढीपर्यंत रुजल्यास समाजात परस्पर आदरभाव वृद्धिंगत होईल, असे मत माघवारी दिंडी प्रमुख ह. भ. प. सर्वोत्तम साटम यांनी सांगितले.

