*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गचा हत्ती उपद्रव न्यायालयात; पकड मोहिमेसाठी ठाम भूमिका*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यात गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या हत्ती उपद्रवामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हत्ती पकड मोहिमेसाठीचा लढा आता न्यायालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी थेट न्यायालयात दावा दाखल करण्याचा ठाम निर्धार जाहीर केला.
या बैठकीत प्रवीण गवस यांनी हत्तींच्या सततच्या धुमाकुळामुळे शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. हत्ती पकड मोहीम ही केवळ पर्याय नसून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच हत्ती पकड मोहीम निश्चितपणे राबवली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. वन विभाग या मोहिमेसाठी पूर्णतः सज्ज असून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय देसाई, माजी जि. प. वित्त व बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, शेतकरी राजाराम देसाई, समीर देसाई, सिंधुदुर्ग उपवनरक्षक मिलिश शर्मा, कोल्हापूर जिल्हा उपवनरक्षक यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हत्ती उपद्रवाच्या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळत असल्याची भावना या बैठकीनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

