*कोंकण एक्सप्रेस*
*म्हापशातील मेधा संदीप जाधव ..बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित*
*महाराष्ट्रातील अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनात हृद्य सत्कार*
*पणजी : प्रतिनिधी*
महाराष्ट्रातील कर्जत-अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौदा शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘कोकण मराठी परिषद, गोवा’च्या कार्यवाह तथा म्हापसा येथील एक कुशल ‘शेफ टीअचर’ सौ. मेधा संदीप जाधव यांना बाया कर्वे पुरस्कार प्रदान करताना त्यांना शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
या एक-दिवसीय संमेलनात प्रारंभी सकाळी ८ ते ९ या वेळेत कर्जत शहरातून भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष अंजली कुलकर्णी, प्रमुख पाहुणे, निमंत्रित कवयित्री, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कन्या मंदिर व दादा पाटील महाविद्यालय येथील विद्यार्थिनींनी विविध स्त्री समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान करून शोभायात्रेत विशेष रंगत आणली.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी प्रास्ताविकात संमेलनाचा उद्देश सांगून महाविद्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अंजली कुलकर्णी यांनी ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे ते आधुनिक काळातील लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, अरुणा ढेरे, कल्पना दुधाळ आदी समाजसुधारक तथा लेखिकांच्या लेखनकार्याचा अभ्यासपूर्ण आढवा घेतला.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी सांगितले, की वाचन व लेखनाची स्फूर्ती मिळावी यासाठी अशा साहित्य संमेलनांची नितांत गरज आहे. शिक्षिका साहित्य संमेलनातून समकालीन जिवंत प्रश्नांचा वेध घेतला जाईल.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार सरोजभाई नारायण पाटील यांच्या वतीने मीनाताई जगधने यांनी स्विकारला. झोपडपट्टी परिसरात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरोजभाई पाटील यांचा गौरव करण्यात आला.
या उद्घाटन सत्रात रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग इन्स्पेक्टर नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, वप्पासाहेब पांडे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडघे, डॉ. संजय कांबळे, प्राचार्य डॉ. मंजूषा बोवडे, डॉ. अनिल शितोळे, सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके, प्रकाश धांडे, काकासाहेब वाळूंजकर, तात्यासाहेब ढेरे व निर्मलाताई पाटील उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन डॉ. भारती काळे व प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले. आभारप्रकटन प्रा. सुखदेव कोल्हे यांनी केले.

.अंजली कुलकर्णी यांचे
मार्गदर्शनपर भाषण
संमेलनाध्यक्ष अंजली कुलकर्णी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या, ‘‘साहित्य संमेलनांतून मूल्यांची पेरणी होते. आजच्या शिक्षका या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक वारसदार आहेत. फुले दाम्पत्याने ग्रंथलेखनातून व प्रत्यक्ष कृतीतून अनिष्ट रुढींवर घणाघात केला. शिक्षणाने मनुष्याचे पशुत्व नष्ट होते, अशी सावित्रीबाईंची मनोधारणा होती. एक स्त्री शिकली, तर कुटुंब आणि समाज शिकतो, या विचारातून फुले दाम्पत्याने परिवर्तनाची लढाई केली.’’
सौ. मेधा जाधव ह्यांचा परिचय
संपूर्ण नाव : सौ. मेधा संदीप जाधव
– पत्ता : फेरा आल्त, आयकॉन बिल्डिंग, धुळेर, म्हापसा, बार्देश-गोवा. ४०३५०७
– जन्मतारीख : ९ ऑक्टोबर १९७७
– शिक्षण : बी.ए., बी.एड.
– नोकरी/व्यवसाय : शेफ टीचर
– संक्षिप्त परिचय : कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यकलाकार, विविध संस्थांच्या पदाधिकारी.
– प्राप्त झालेली पदे :
(१) कार्यवाह, ‘कोकण मराठी परिषद, गोवा’.
(२) अध्यक्ष, ‘मराठी साहित्य मंडळ, गोवा प्रदेश’.
(३) गोवा प्रदेश अध्यक्ष, ‘हिरकणी नारीशक्ती ब्रिगेड’.
(४) अध्यक्ष, ‘मानव अधिकार गोवा राज्य’,
– मिळालेले पुरस्कार : आतापर्यंत सुमारे ९० पुरस्कार प्राप्त. (उदाहरणार्थ; सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न, राष्ट्र शाहीर अमर शेख, राष्ट्रीय संस्कार रत्न, भिमाई रमाई भिमाई, लोक कवी नातू, जगदीश खेबूडकर).
– लेखन : स्वरचित कविता अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध. मुक्त, गझल, चारोळ्या, स्त्रीजीवनावर आधारित अशा विविधांगी स्वरूपात लेखन.

