*कोकण Express*
*महामानवाना जातीत वाटून घेतल्याने एकूण समाजाचे नुकसान*
*’बाबसाहेब सर्वांचे युगानुयुगे’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन*
*नाशिक पुरोगामी विचार मंचतर्फे आयोजन*
*कणकवली/प्रतिनिधी*
आताच्या महामारीच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात स्नेहभाव वाढविणारे आहेत. अशा काळातच बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करून बाबासाहेब सर्वांचे कसे आहेत हे पटवून देण्याची गरज आहे.मात्र या कठीण काळातही महामानव आपापल्या जातीनुसार वाटून घेतल्यामुळे एकूण समाजाचे मोठं नुकसान झाले आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी ‘बाबासाहेब सर्वांचे युगानुयुगे’ या व्याख्यानात केले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त पुरोगामी विचार मंच नाशिकतर्फे कवी कांडर यांचे सदर व्याख्यान ऑनलाइन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी महामानवांचे विचार समजून घेऊन सर्व जात-धर्म एकत्र नांदू शकला तरच समाज पुढे जाऊ शकतो असे आग्रहाने सांगितले.
यावेळी व्याख्यान संयोजन समितीचेचे अशोक उफाडे,डॉ मारुती कसाब, डॉ.सोमनाथ कदम, जोशीला लोमटे, डॉ प्रल्हाद दुधाने आदी उपस्थित होते.
कांडर म्हणाले आज आपण कटिंण काळात जगत आहोत.कोरोना महामारीत माणसाची शाश्वती राहिली नाही. माणसाचं जगणं क्षणभंगुर आहे याची जाणीव आता सगळ्यांना झाली आहे. अशा काळात बाबासाहेबांसारख्या महामानवाने आपल्याला एकात्मतेचा विचार कसा दिला आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.असं झालं नाही तर दिवसेंदिवस समाजात धर्माच्या नावाखाली समाजच विघटन जास्तीत जास्त होऊ शकते. बाबासाहेबांचे विचार हे मानवतेकडे जाणारे आहेत. आणि हे विचार सर्वाधिक समाजाकडे पोहोचविणे ही आजची गरज आहे.
व्यवस्थित व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी लेखक-कवीनी लिहायचं असतं. मनोरंजन आणि टाईमपास करण्यासाठी कवी लिहीत नसतो. याची जाणीव समाजाला होण्याची गरज आहे. बाबासाहेब यांच्या विचाराचा अभ्यास केल्यावर आणि त्यांच्या चळवळीचा विचार केल्यावर आपल्याही असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी आपलं आयुष्य व्यवस्थेत हस्तक्षेप खर्च करण्यासाठी घालवलं. व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीच जेव्हा आपण लिहितो तेव्हाच समाजाबद्दलचे प्रश्न पडत असतात. आणि मग आपल्या लक्षात येतं बाबासाहेबांनी एकूण समाजासाठी किती काम केले आहे ते.व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी कवीला सांस्कृतिक राजकारण करावं लागतं.आणि सकारात्मक राजकारण करणे हा कविचा महत्त्वाचा हस्तक्षेप असतो. मात्र याची जाणीव आपल्याकडल्या बहुसंख्य कवी ना नसते म्हणूनच कवी स्वतःच्या प्रेमात पडून जगत राहतात.अनेक कवींना यामुळेच आपल्या कवितांपलीकडे समाज दिसत नाही.सर्व जातीतील महिलांना बाबासाहेबांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांनी हिंदूकोड बिल संसदेत मांडले पण त्याला हिंदूंनीच विरोध केला. मात्र पुढे ते तुकड्या-तुकड्याने पास झाले. आणि त्यामुळेच महिला देशात पुढे जाताना दिसतात. महिलांच्या शिक्षणाचा आग्रह बाबासाहेब धरायचे. महिलांच्या शिक्षणाचा पाया फुलेनी घातला आणि त्या शिक्षणाचा कळस बाबासाहेबांनी चढवला याची जाणीव प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक महिलेला असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी संविधानाचा अभ्यास करावा.असे बाबासाहेब एकाच जातीच्याच समाजाचे सुधारक कसे होऊ शकतील? असा सवालही कांडर यांनी केला.