महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यलेखन कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यलेखन कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यलेखन कार्यशाळा संपन्न*

*कणकवली:प्रतिनिधि*

कवी आपली कविता कोणत्या छंदात लिहितो, यापेक्षा तो भवतालाशी किती प्रामाणिक राहतो हे महत्वाचे ठरते. मानवी जीवनातील भावभावनांचे विविध कंगोरे तो आपल्या कवितेतून शब्दांकित करत असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि संवादक सतीश सोळांकूरकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या आर्थिक सहयोगाने आणि दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोपुरी आश्रम वागदे येथे संपन्न झालेल्या एकदिवशीय काव्यलेखन कार्यशाळेच्या मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.
श्री.सोळांकूरकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की,कवितेच्या कार्यशाळेत कवी निर्माण केला जात नाही तर त्याच्या आंतरिक अभिव्यक्तीला चालना दिली जाते. कवीच्या भावना आणि विचार मुक्त असल्या तरी त्यात छंद असतोच..तेव्हाच मुक्तछंद काव्य आकाराला येते. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील स्थित्यंतरे, प्रेम, वेदना आणि आशा-निराशेचे क्षण तो आपल्या कवितेतून अधोरेखित करत राहतो. अशा कार्यशाळेतून त्याच्या संवेदनशील आणि विचारशील वृत्तीला सामाजिक भान देणे गरजेचे आहे.असे सांगत त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कवितेविषयी अर्थवाही विवेचन केले. आपल्या काही निवडक कवितांचे अभिवाचन केले.’ एक आई सोडली तर माझ्याकडे वडिलोपार्जित असं काहीही नाही’ तसेच ‘ आईला भाकरी करत असताना मी पाहिलेले आहे. ‘ अशा आईविषयी कवितांचे आशयगर्भ सादरीकरण करत त्यांनी अनेकाची मने जिंकली.
कार्यशाळेचे उद्घाटन अधिव्याख्याते आणि भाषा अभ्यासक प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर यांनी केले.उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित कवींशी संवाद साधताना म्हणाले ,की कवी हा वर्तमान परिस्थितीचा खरा नायक असतो. त्याने पाहिलेले, साहिलेले भावस्पर्शी प्रसंग तो आपल्या कवितेतून मांडत राहतो. व्यक्तीकडून समष्टीकडे घेऊन जाणारा त्याचा भावसंवाद समाजाला नवे भान देत असतो.कवी जसा आपल्या कवितेतून इथल्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकतो, तसाच एखादा कार्यकर्ताही इथल्या व्यवस्थेशी आपल्या कृतीतून संघर्ष करत राहतो. म्हणूनच कवी आणि कार्यकर्ता हे समाजाचे खरे प्रवर्तक असतात असे मत श्री.मुंबरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन सत्रात मराठी भाषा अभ्यासक प्रा.सीमा हडकर ‘ कविता आणि अभिव्यक्ती ‘ या विषयावर विवेचन करताना म्हणाल्या की, आशय हा कवितेचा मूळ गाभा असतो.आणि अभिव्यक्ती ही त्या गाभ्याचे सौंदर्य असते.कवी या दोघांचा शाब्दीक समन्वय साधतो तेव्हा कवितेची निर्मिती होते.कवितेतील प्रतिमा, प्रतिके, कल्पनाशक्ती, वृत्त, लय, गेयता आणि अलंकारिक शब्दांचा योग्य वापर केल्यास ती कविता वाचकांच्या मनाला स्पर्शून जाते.विचार करायला लावते.कवीच्या आंतरिक उर्मींचे दर्शन घडविते.प्रेम,करुणा, वेदना, जीवनाचे तत्वज्ञान, सामाजिक व्यवस्था, निसर्गविषयक सौंदर्यदृष्टी, आणि राष्ट्रीय एकात्मता अशा आशयसूत्रातून कवितेची बांधणी झाल्यास कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती परिणामकारक होते.असे सांगून प्रा.हडकर यांनी काही निवडक कवितांचे दाखले देत आपल्या विषयाचे आशयघन विश्लेषण केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम, साहित्य विभाग प्रमुख प्रा.सिद्धार्थ तांबे, कवी प्रा.मोहन कुंभार, कवी अरूण नाईक, इंजि.अनिल जाधव, दर्पण महिला फ्रंट अध्यक्षा प्रा.पूनम हेदुळकर, दर्पण स्टुडंट फेडरेशन अध्यक्ष राहूल उर्फ राजा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रसंवादचे संपादक इंजि.अनिल जाधव, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीचे तज्ज्ञ संचालक पदी निवड झालेले प्रा.सिद्धार्थ तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून किशोर कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दुसर्‍या सत्रात कवींशी संवाद आणि उपस्थित कवींच्या कवितांचे अभिवाचन करण्यात आले. मार्गदर्शक कवी सतीश सोळांकूरकर यांनी उपस्थित कवींशी संवाद साधत त्यांच्या कवितेविषयीचे विचार जाणून घेतले.
‘देणे घेणे जीवघेणे ,त्याचा होतो झुला
शब्दासाठी जीव दिलास, काय मागू तुला ‘
अशा अनेक काव्यपंक्ती वापरत कवितेचा भावस्पर्शी माहोल निर्माण केला. मुक्तछंदात कविता लिहिण्यासाठी आधी कवीकडे मुक्तशैली असावी लागते. आपल्या प्रतिभेशी प्रामाणिक रहावे लागते.यावेळी उपस्थित कवींनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये विशाखा काव्यपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी अरूण नाईक,अभिनेते निलेश पवार, कवयित्री कल्पना बांदेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तर किशोर कदम ,श्रेयश शिंदे, पी.व्ही. कदम, निलम जंगम, काशिनाथ वर्देकर, प्रा पूनम हेदुळकर, महेंद्र कदम यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर तांबे यांनी काव्यलेखन कार्यशाळा आयोजित करण्याचे महत्व विशद केले आणि उपस्थित कवींना सदिच्छा दिल्या. काव्यलेखन कार्यशाळेस संस्थेच्या उपाध्यक्षा सुचित्रा कदम, प्रज्ञा कदम, स्नेहल तांबे,रसिका कदम, संतोष तांबे,विशाल हडकर,आनंद तांबे,पी.जी.कदम,नितीन कदम, दिलीप कदम, प्रभाकर चव्हाण, सुशील तांबे आदी संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कदम, सेवानिवृत्त प्रयोगशील शिक्षक राजेंद्र कदम, सुनील कुपवडेकर ,गुरुनाथ वर्देकर आणि बहुसंख्य काव्यरसिक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम यांनी काव्यलेखन कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संपूर्ण कार्यक्रमास सदिच्छा दिल्या. साहित्य विभाग प्रमुख प्रा.सिद्धार्थ तांबे यांनी प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. कार्यशाळेचे सर्व अभिलेखे संपर्क प्रमुख गौरव कदम यांनी तयार केले होते.तर आभार संस्थेचे सरचिटणीस सुनिल तांबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!